राष्ट्रपतीपदाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेत फूट, खासदारांची आक्रमक भूमिका

संजय राऊत यांनी मात्र यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देण्यासाठी आग्रह धरला.
राष्ट्रपतीपदाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेत फूट, खासदारांची आक्रमक भूमिका

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावर शिवसेनेत फूट पडली आहे. राष्ट्रपतीपदाच्या भाजपप्रणित रालोआच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा द्यावा, अशी सर्वच खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर आक्रमकपणे एकमुखी भूमिका मांडली. संजय राऊत यांनी मात्र यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देण्यासाठी आग्रह धरला. यावरून बैठकीत तीव्र मतभेद निर्माण झाल्याचे समजते. त्यामुळे या मुद्द्यावर संजय राऊत एकटे पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, निर्णयाचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आले असून ते येत्या एक-दोन दिवसांत आपला निर्णय जाहीर करणार आहेत. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला जोरदार हादरा दिला. शिवसेनेचे बहुतांश आमदार नेतृत्वाविरोधात गेल्यानंतर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील उमेदवाराला पाठिंबा देण्यावरून आता खासदारांनीही वेगळी भूमिका घेतली. शिवसेना खासदार राहुल शेवाळे, राजेंद्र गावित यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली. खासदारांकडून होत असलेल्या या मागणीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मातोश्रीवर खासदारांची बैठक घेतली. या बैठकीत पाठिंब्यावरून शिवसेना खासदारांमध्ये दोन गट पडल्याचे समजते. आजच्या बैठकीत अनेक खासदारांनी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली. शिवाय शिंदे गट आणि भाजपशी जुळवून घेण्याची विनंतीही उद्धव ठाकरे यांना करण्यात आली. भाजपशी पुन्हा युती करणे हे पक्षाच्या हिताचे आहे, असे या खासदारांनी सांगितले. तर संजय राऊत यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील दुसरे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या बाजूने आपले मत मांडले. त्यामुळे बैठकीत पाठिंब्याबाबत ठोस निर्णय होऊ शकला नाही. शेवटी निर्णयाचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देत बैठक संपली.  बैठकीत द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा या दोन्ही नावांवर चर्चा झाली. शिवसेनेने यापूर्वीही पक्षीय राजकारणाला बाजूला ठेवत व्यक्ती म्हणून प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी अशा नावांना पाठिंबा दिला होता. आतादेखील खासदारांनी याबाबतचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहेत. देश आणि राज्यातील जनतेची भावना लक्षात घेऊन उद्धव ठाकरे निर्णय घेतील आणि तो सर्व आमदार आणि खासदारांना मान्य असेल, असे संजय राऊत म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in