मुंबई : सर्वच स्तरातून विधानसभा अध्यक्षांना लक्ष्य केलेले असतानाच आता शिवसेना ठाकरे गटाने मंगळवार, दि. १६ जानेवारी रोजी ४ वाजता मुंबईत वरळी डोम येथे महापत्रकार परिषद घेऊन विधानसभा अध्यक्षांची पोल खोलण्याचे ठरविले आहे. त्यामुळे मंगळवारी उद्धव ठाकरे नेमके काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
आमदार अपात्रतेसंबंधीचा निकाल नुकताच विधानसभा अध्यक्षांनी दिला आणि ठाकरे गटाचे अनेक दावे फेटाळून लावत शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला बहाल केले. एवढेच नव्हे, तर २०१८ ची पक्षाची घटना अमान्य करीत १९९९ ची घटना गृहीत धरून संघटनात्मक गोष्टींना महत्त्व न देता विधिमंडळ पक्षाच्या बहुमताच्या बाजूने निकाल दिला. तसेच शिंदे गटाच्याच प्रतोदची नेमणूक वैध ठरवली आणि त्यांच्या मागणीत तांत्रिक चूक असल्याचे सांगत ठाकरे गटाचे आमदारही पात्र ठरवले. त्यामुळे सभापतींच्या या निर्णयावर विरोधकांनी हल्लाबोल केला.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या मुदतीत म्हणजे १० जानेवारी रोजी शिवसेनेच्या दोन्ही गटातील अपात्रतेच्या वादावर निकाल दिला. या निकालात केंद्रीय निवडणूक आयोगाकडील कागदपत्रांचा आधार घेऊन पक्षाच्या १९९९ च्या घटनेचा संदर्भ देत शिवसेना शिंदे गटाची असल्याचा निर्वाळा दिला. मात्र, या निकालात विधानसभा अध्यक्षांनी जाणीवपूर्वक चुका केल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. त्याचीच पोलखोल करण्याचा ठाकरे गटाचा इरादा आहे. त्यासाठीच त्यांनी मंगळवारी महापत्रकार परिषद आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेत विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाबाबतचे काही धक्कादायक खुलासे करण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांनी या महापत्रकार परिषदेत कायदेतज्ज्ञांनादेखील बोलावले आहे.
या महापत्रकार परिषदेला केवळ पत्रकार नाही, तर कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतादेखील उपस्थित राहू शकणार आहे. आमदार अपात्रतेसंबंधीच्या खटल्यात विधानसभा अध्यक्षांनी जो निकाल दिला, त्या निर्णयाविरोधातच उद्धव ठाकरे महत्त्वाचे मुद्दे मांडण्याची शक्यता आहे. विशेषत: निकाल देताना विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना पक्षाची २०१८ ची घटना अमान्य केली. मात्र, २०१८ च्या घटनेत जो काही बदल झालेला आहे त्या बदलाची ठाकरे माहिती देतील आणि निवडणूक आयोगाकडे या घटनेची प्रत पाठविली असल्याचे पुरावेही दिले जाण्याची शक्यता आहे. एकूणच या महापत्रकार परिषदेत विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाचीच पोल खोलण्याची शक्यता आहे. त्यामुळे या महापत्रकार परिषदेला विशेष महत्त्व असणार आहे. त्यामुळे कायदेतज्ज्ञांच्या मदतीने उद्धव ठाकरे विधानसभा अध्यक्षांना कसे उघडे पाडतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
जनता न्यायालय
ठाकरे गटाने आयोजित केलेली ही महापत्रकार परिषद म्हणजे जनता न्यायालयाच असल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे. त्यामुळे या महापत्रकार परिषदेला पत्रकारांसोबतच सामान्य जनता आणि कार्यकर्त्यांनाही उपस्थित राहण्यास मुभा असणार आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची मंगळवारी जनता न्यायालयात पोल खोलली जाऊ शकते, असे बोलले जात आहे