मुंबईत शिवसेना ठाकरे गट देणार 'हे' नवे चेहरे; मातोश्रीवर होणार अंतिम निर्णय

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केल्याने मुंबईतील ३६ मतदारसंघांत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

गिरीश चित्रे/मुंबई

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केल्याने मुंबईतील ३६ मतदारसंघांत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे यांनी विद्यमान आमदार, पदाधिकाऱ्यांची सोमवारी तातडीने बैठक बोलावली. मात्र, या बैठकीत कोणताही निर्णय न झाल्याने नव्या चेहऱ्यांना उमेदवारीसाठी ‘मातोश्री’च्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत विजयासाठी जोमाने कामाला लागा, असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याचे सांगण्यात आले.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकसंघपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. २८८ मतदारसंघांत उमेदवार निश्चितीसाठी मविआत बैठकांचे सत्र सुरू आहे. मात्र, शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे सूर जुळत नसल्याने मविआत वाद उफाळून आला आहे.

काँग्रेस बॅकफूटवर जाण्यास तयार नसल्याचे लक्षात येताच उद्धव ठाकरे यांनी सोमवारी ‘मातोश्री’वर पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी रणनीती ठरवण्यात आली. पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत जोमाने कामाला लागा, असे निर्देश ठाकरे यांनी दिल्याचे शिवसेनेतील वरिष्ठ नेत्याने सांगितले.

ठाकरेंच्या शिवसेनेचे संभाव्य नवे चेहरे

प्रविणा मोरजकर (कुर्ला), सुधीर साळवी (लालबाग), अमोल कीर्तीकर (गोरेगाव), महेश सावंत (माहीम), संजना घाडी (मागाठाणे), किशोरी पेडणेकर (भायखळा), रमाकांत रहाटे (परळ), तेजस्विनी घोसाळकर (दहिसर), आदित्य शिरोडकर, विजय परब, संजय सावंत (चेंबूर), वरुण सरदेसाई (वांद्रे पूर्व).

उद्धव ठाकरेच भावी मुख्यमंत्री - भास्कर जाधव

उद्धव ठाकरे कोणालाही संधी देवो, पण कट्टर शिवसैनिक म्हणून आम्ही काम करणार आणि उद्धव ठाकरेच भावी मुख्यमंत्री होतील, असा विश्वास आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in