प्रतिनिधी/मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात आता वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. सोमवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी तसेच महायुतीतील शिंदे सेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.
राज्यात पाचव्या टप्प्यात १३ लोकसभा मतदारसंघात निवडणूक होत आहे. त्यात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्यासाठी २६ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. ३ मे ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. असे असले तरी अद्याप महाविकास आघाडीने उत्तर मुंबईत तर महायुतीने उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबईत उमेदवार जाहीर केलेले नाहीत.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी सोमवारी आपापले उमेदवारी अर्ज भरले. यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, काँग्रेसचे आमदार अमीन पटेल, भाई जगताप, विधान परिषद सदस्य कपिल पाटील आदी उपस्थित होते. यावेळी शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.
शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांनीही दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, भाजप आमदार कालिदास कोळंबकर, तमिल सेल्वन आदी उपस्थित होते.
गोयल, वर्षा गायकवाडांचा मंगळवारी अर्ज
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पीयूष गोयल हे मंगळवारी सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी भाजपकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. उत्तर मध्य मुंबईतील काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड या सुद्धा मंगळवारीच आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.