त्यांची कितीही कुळं खाली उतरली तरी शिवसेना संपणार नाही - उद्धव ठाकरे

‘मार्मिक’ व्यंगचित्र साप्ताहिकाच्या ६२व्या वर्धापनदिनी शनिवारी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला
त्यांची कितीही कुळं खाली उतरली तरी शिवसेना संपणार नाही - उद्धव ठाकरे

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर बहुतांश आमदार व खासदार शिवसेनेतून बाहेर पडले. त्यामुळे शिवसेना संपल्याची हाकाटी भाजपकडून करण्यात येऊ लागली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी तर प्रादेशिक पक्ष लवकरच संपुष्टात येतील, असे विधान केले. या वक्तव्याचा शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. भाजपने नुकतीच प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची नेमणूक केल्याचा उल्लेख करीत ठाकरे म्हणाले की, त्यांची कितीही कुळं खाली उतरली तरी शिवसेना संपणार नाही.

‘मार्मिक’ व्यंगचित्र साप्ताहिकाच्या ६२व्या वर्धापनदिनी शनिवारी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर आणि विशेषत: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यावर हल्लाबोल केला. ‘‘८-१० दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांनी केलेले वक्तव्य लोकशाहीला घातक आहे की नाही, हा विचार करायला हवा. ते म्हणाले की, या देशात एकच पक्ष राहणार आहे, बाकीचे पक्ष संपत चालले आहेत.

विशेषत: शिवसेना संपत चाललेला पक्ष आहे. बघू कोण संपतय,’’ असे आव्हान त्यांनी दिले. ‘नड्डांनी जे प्रदेशाध्यक्ष नेमले आहेत, त्यांच्या नावात किती कुळे आहेत, हे मला माहिती नाही; पण त्यांची कितीही कुळं उतरली, तरी शिवसेना संपवणं शक्य नाही. मग ती बावन असतील किंवा एकशे बावन असतील. त्याने मला फरक पडत नाही’, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली.

सगळे मंत्री आज ‘आझाद’ आहेत

एकनाथ शिंदे सरकारवरही त्यांनी टीकास्त्र सोडले. ‘राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे; पण महाराष्ट्रात सरकार आहे कुठे? काहीही न करता स्वत:चे सत्कार करून घेतले जात आहेत; पण अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तिकडे जायला मंत्री कुठे आहेत? मंत्र्यांचे खातेवाटपच झालेले नाही. सगळे मंत्री आज ‘आझाद’ आहेत. आझादी का अमृत महोत्सव सुरू आहे. पदं मिळाली आहेत; पण जबाबदारी नाही. करा मजा’, असा टोला त्यांनी लगावला.

...तर तो अमृत महोत्सव कसला?

‘देशाची मांडणी संघराज्य पद्धतीची आहे. त्यात अनेक राज्य एकत्र आले आहेत. मग नड्डांना नेमकं काय म्हणायचंय? प्रादेशिक पक्ष संपवायचेत म्हणजे तुम्हाला संघराज्य पद्धत संपवायची आहे का? संघराज्य तुम्हाला नको आहेत का? तुम्ही गादीवर बसलात म्हणून ‘हम करे सो कायदा’ ही काही लोकशाही नाही. अमृतमहोत्सवी वर्षात लोकशाही मृतावस्थेत न्यायची असेल, तर तो अमृत महोत्सव कसला?’ असा सवालही उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. शिवसेना ही उघड्यावर पडलेली वस्तू आहे, असे काही जणांना वाटते. पण, तसे नाही. शिवसेनेची पाळेमुळे ६२ वर्षे तर सरळ दिसत आहेतच, पण त्याच्या आधीपासून सुद्धा माझ्या आजोबानी या विचारांची पेरणी केली आहे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.

घरच नाही तर

तिरंगा लावणार कुठे?

नुसता तिरंगा फडकावला म्हणजे आम्ही राष्ट्रभक्त, देशभक्त झालो का? भारतमाता आपलीच मालमत्ता आहे, असे आपल्याला वाटते. मायबाप सरकारने कार्यक्रम दिला आहे, ‘हर घर तिरंगा’; मात्र घराचा पत्ता नाही, ज्यांच्याकडे घरच नाही ते तिरंगा लावणार कुठे? अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हर घर तिरंगा’ उपक्रमावरही टीका केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in