
विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेच्या अंबादास दानवे यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांच्या नावाची शिफारस केली होती. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्याला मान्यता दिली आहे.
विधानपरिषदेत शिवसेनेचे १२, राष्ट्रवादीचे १०, तर काँग्रेसचे १० सदस्य आहेत. विधानपरिषदेत विरोधी पक्षातील सर्वात मोठा पक्ष म्हणून विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेचा सदस्य नेमावा, असे पत्र उपसभापती नीलम गोऱ्हे यांना शिवसेनेकडून देण्यात आले होते. त्यानंतर अंबादास दानवे यांच्या नावाची शिफारस करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पत्र सोमवार, ८ ऑगस्ट रोजी शिवसेना उपनेते अरविंद सावंत यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना सुपूर्द केले होते. त्यानंतर ९ ऑगस्ट रोजी दुपारी उपसभापती नीलम गोर्हे यांनी विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची निवड करण्यात आल्याचे जाहीर केले. दरम्यान, शिवसेना नेमकी कोणाची? यावरून न्यायालयीन वाद सुरू आहे. शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून परस्परांविरोधात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.