शिवाजी पार्क सुशोभीकरण प्रकल्प रखडण्याची शक्यता

शिवाजी पार्कच्या सुशोभीकरणाची चार कोटी सात लाख २४ हजार ४१६ रुपयांची निविदा काढली
शिवाजी पार्क सुशोभीकरण प्रकल्प रखडण्याची शक्यता

महाविकास आघाडी सरकार पायउतार होताच, भाजपने शिंदे गटाच्या सहकार्याने सत्ता स्थापन केली आहे. शिंदे व भाजपची सत्ता स्थापन होताच माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पांना ब्रेक दिला जात आहे. दादर येथील शिवाजी पार्क मैदानाचे सुशोभीकरण करण्यास स्थानिक रहिवाशांनी विरोध केल्यानंतर आता सुशोभीकरण प्रकल्प रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या प्रकल्पाला गती देण्यासाठी कोअर कमिटीची लवकरच स्थापना करण्यात येणार असून समिती व सल्लागाराच्या सल्ल्यानुसार सुशोभीकरणाचे काम होईल, असा विश्वास जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी व्यक्त केला. शिवाजी पार्कच्या सुशोभीकरणाची चार कोटी सात लाख २४ हजार ४१६ रुपयांची निविदा काढली होती. त्यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग, शेणखतयुक्त लाल माती, गवत लावणे, ऐतिहासिक प्यायूचे सुशोभीकरण करणे, यासारखी कामे अपेक्षित होती. या मैदानात ४५० ट्रक अतिरिक्त लाल मातीमुळे स्थानिकांना त्रास होत असल्याने याला विरोध करण्यात येतो आहे. येथील रहिवाशांनी मैदान समतल करण्याकरिता वापरण्यात आलेल्या माती भरावामुळे भविष्यात धुळीची समस्या मोठ्या प्रमाणात उद‌्भविण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच धूळ उडण्यास प्रतिबंध करण्यासाठी लागवड करण्यात आलेल्या गवताबाबतही विरोध दर्शविला आहे.

नव्याने तयार करण्यात आलेल्या रेनवॉटर हार्वेस्टिंग यंत्रणेच्या उपयोगितेबाबतही साशंकता व्यक्त केलेली आहे. ही बाब लक्षात घेऊन शिवाजी पार्क परिसरातील स्थानिक रहिवासी व जी/उत्तर विभागाच्या अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत या प्रकल्पाची तांत्रिक पडताळणी करण्याचे निश्चित झाले आहे. शिवाजी पार्कचे स्थानिक रहिवासी, सदर प्रकल्पाचे तज्ज्ञ सल्लागार, रेनवॉटर हार्वेस्टिंग यंत्रणेशी संबंधित तज्ज्ञ सल्लागार तसेच महानगरपालिकेचे उद्यान विभागाचे अधिकारी व तज्ज्ञ सल्लागार यांची कोअर कमिटी स्थापन करण्याचे ठरले आहे. या विषयावर उपाययोजना या पुढच्या काळात करण्यात येणार आहेत. त्यामुळेच समितीच्या सल्ल्याच्या उपाययोजना जोवर स्पष्ट होत नाहीत, तोवर या प्रकल्पाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in