

मुंबई : दादर येथील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर विनापरवानगी बेकायदेशीरपणे आंदोलन करणे आणि लाऊडस्पीकरचा वापर करणे 'कॉकरोच जनता पार्टी' (सीजेपी) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना महागात पडले आहे. पोलिसांनी परवानगी नाकारलेली असतानाही २ ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्कवर गर्दी जमवून जोरदार घोषणाबाजी केल्याप्रकरणी दादर पोलिसांनी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके, 'सीजेपी'चे राष्ट्रीय संघटक अजिंक्य शिंदे, मुंबई कोऑर्डिनेटर प्रणव आहिरे यांच्यासह तब्बल ४०० ते ५०० कार्यकर्त्यांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. शिवाजी पार्क परिसरातील एका स्थानिक नागरिकाने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सीजेपी'चे राष्ट्रीय संघटक अजिंक्य शिंदे आणि मुंबई कोऑर्डिनेटर प्रणव आहिरे यांनी २ ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्क येथे आंदोलनासाठी परवानगी मागितली होती. मात्र, सुरक्षेचे आणि कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी आंदोलनाला स्पष्ट शब्दांत परवानगी नाकारली होती.
अद्याप कोणालाही अटक नाही...
याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणातील कथित अनियमिततेप्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करत कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी पार्क येथे हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.
विनापरवानगी सभा घेणे भोवले
पोलिसांनी परवानगी नाकारूनही गुरुवार, २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ ते ७ वाजेच्या सुमारास शिवाजी पार्क मैदान, गेट क्रमांक ६, मीनाताई ठाकरे स्मारकासमोर शेकडो 'सीजेपी' समर्थक एकत्र जमले. आंदोलकांनी विनापरवानगी सार्वजनिक ठिकाणी सभा घेऊन घोषणाबाजी केली तसेच मोठ्या आवाजात लाऊडस्पीकरचा वापर केला. भारतीय न्यायसंहितेनुसार कारवाई, कोणावर झाले गुन्हे दाखल ? विनापरवाना जमाव जमवणे, सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीला व नागरिकांना अडथळा निर्माण करणे आणि पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दादर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे.
प्रमुख नेत्यांवर गुन्हे दाखल
'सीजेपी 'च्या प्रमुख नेत्यांवर गुन्हे दाखल झाले असून त्यात अजिंक्य शिंदे (राष्ट्रीय संघटक), प्रणव आहिरे (मुंबई कोऑर्डिनेटर), अभिजीत दीपके, सौरभ दास, आशुतोष रांका, आफरीन नवाज, सौम्या कोरडे, अंकित भारद्वाज, विजय मलंगी, योगेश इंगळे तसेच अन्य ४०० ते ५०० अज्ञात समर्थकांचा समावेश आहे.