
अमेरिकन डॉलरच्या नावाने फसवणूक करणाऱ्या एका दुकलीस शिवडी पोलिसांनी अटक केली. शफीउल्ला इस्लाम नूर इस्लाम गाझी आणि रफिक जमशेद शेख अशी या दोघांची नावे आहेत. रिंकू नावाच्या एका आरोपीस पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून, त्याचा पोलीस शोध घेत असल्याचे एपीआय स्नेहलसिंग खुळे यांनी सांगितले. मोहम्मद ताहीर शौकअली अन्सारी हे शिवडीतील इंदिरानगर परिसरात राहत असून, त्यांचा तिथे किराणा मालाचे एक दुकान आहे. मार्च महिन्यांत त्यांना या आरोपींनी स्वस्तात अमेरिकन डॉलर देण्याची बतावणी करून त्यांच्याकडील सुमारे अडीच लाख रुपयांची कॅश पळवून नेली होती.
याप्रकरणी शिवडी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा नोंद होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळूराव घागरे यांच्या पथकातील एपीआय स्नेहलसिंग खुळे, उपनिरीक्षक अविनाश मोरे, अंमलदार मुजावर, जाधव, आठरे, लाड, माळोदे यांनी तपासाला सुरूवात केली होती. आरोपींचा शोध सुरू असताना शफीउल्ला याला कोलकातामार्गे बांगलादेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना बांगलादेश सीमेवरून या पथकाने अटक केली. त्याच्या चौकशीत रफिकचे नाव समोर आले होते. रफिक हा कोलकाता येथे पळून जाण्याच्या तयारीत होता. दोन दिवसांपूर्वी तो सीएसएमटीहून जात असताना त्याला दादर रेल्वे स्थानकातून स्नेहलसिंग खुळे व त्यांच्या पथकाने शिताफीने अटक केली. या दोघांकडून पोलिसांनी चार मोबाईल हस्तगत केले आहे. त्यांच्याकडून लवकरच गुन्ह्यांतील कॅश हस्तगत केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.