

मुंबई : शिवडी मध्यविभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ‘शिवडीचा राजा’ गणेशोत्सव मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त यंदा भक्तांसाठी पाण्याखालील द्वारकेचा आकर्षक होलोग्राम देखावा साकारण्यात आला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतीय कौशल्य आणि नवकल्पनांची ओळख जनसामान्यांना करून देण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत जाधव यांनी दिली.
यंदाच्या देखाव्यात भगवान श्रीकृष्णाची द्वारका नगरी समुद्राच्या तळाशी असल्याची संकल्पना होलोग्राम तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साकारण्यात आली आहे. भारतातही अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असून त्याचा प्रभावी वापर केल्यास अशा अनुभवांसाठी परदेशात जाण्याची गरज भासणार नाही, हा संदेश या देखाव्यातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
सामाजिक कार्यातही मंडळ अग्रेसर
गणेशोत्सवाबरोबरच सामाजिक कार्यातही मंडळ अग्रेसर आहे. गेल्या दहा वर्षांपासून मंडळाच्या वतीने पुस्तक पेढी उपक्रम राबविण्यात येत आहे. अवघ्या ३०० रुपयांच्या आजीवन सभासद शुल्काद्वारे विद्यार्थ्यांना आठवीपासून उच्च शिक्षणापर्यंत विविध विषयांची पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. सध्या या उपक्रमाशी ८९० विद्यार्थी जोडले गेले असून शिवडी परिसरातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळतो, असे श्रीकांत जाधव यांनी सांगितले.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सातत्याने प्रयत्न
राज्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास मदतीचा हात देण्याचे कामही मंडळ करत आले आहे. सांगलीतील महापुराच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले होते. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडळाने सातत्याने प्रयत्न केले असून जलसंवर्धन विषयावरील जनजागृतीबद्दल महाराष्ट्र शासनाने ‘पर्यावरणपूरक शिवडीचा राजा गणेशोत्सव मंडळ’ म्हणून सन्मानित केले आहे.
सामाजिक बांधिलकी, आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम
आरोग्यविषयक विविध उपक्रम, सामाजिक बांधिलकी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम साधणाऱ्या या मंडळाचा पाण्याखालील द्वारकेचा होलोग्राम देखावा यंदा गणेशभक्तांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. भुलेश्वर येथील घटना दुर्दैवी आहे. परंतु शिवडीचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून बाप्पाच्या गणेश मूर्तीची आधीपासूनच काळजी घेतली जाते, असेही ते म्हणाले.