प्रभादेवीत शिवनेरीची पादचाऱ्यांना धडक; एकाचा मृत्यू, दोन जखमी

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) शिवनेरी बसने प्रभादेवी भागात तिघांना धडक दिली.
प्रभादेवीत शिवनेरीची पादचाऱ्यांना धडक; एकाचा मृत्यू, दोन जखमी
Published on

मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) शिवनेरी बसने प्रभादेवी भागात तिघांना धडक दिली. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. बुधवारी मध्यरात्री २.३० वाजता प्रभादेवी पुलावर ही घटना घडली.

प्रणय बोडके (२९), करण शिंदे (२९) आणि दुर्वेश गोरडे हे तिघे दुचाकीवरून दादरच्या फुल बाजारात फुले आणण्यासाठी जात होते. होळीच्या पूजेसाठी त्यांना फुले हवी होती. त्याचवेळी प्रभादेवी पुलावर समोरून शिवनेरी बस चुकीच्या दिशेने भरधाव वेगात आली. या बसने प्रणयच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर स्थानिकांनी या तिघांना केईएम रुग्णालयात नेले. प्रणयचा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. तर, दुर्वेश व करण गंभीर जखमी असून त्यांच्यावर ग्लोबल रुग्णालयात उपचार चालू आहेत.

दरम्यान, बस चालक इक्बाल शेख याला अटक करण्यात आली आहे. अपघातानंतर स्थानिकांनीच त्याला पकडून भोईवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. या अपघातात प्रणय बोडके याचा मृत्यू झाला आहे. प्रणयच्या मागे त्याची पत्नी, आई, वडील व दीड वर्षांचा मुलगा असे कुटुंब आहे. प्रणय हा त्याच्या घरातील एकटाच कमावणारा होता. त्याचं कुटुंब काळाचौकी येथील ऐक्यदर्शन सोसायटी येथे वास्तव्यास आहे.

logo
marathi.freepressjournal.in