BMC च्या निवडणुकीत किती जागा लढवणार? शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी दिली महत्त्वाची माहिती

राज्यात लोकसभा, विधानसभा निवडणुका पार पडल्यावर आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकांकडे सर्वपक्षीयांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
BMC च्या निवडणुकीत किती जागा लढवणार? शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी दिली महत्त्वाची माहिती
Published on

मुंबई : राज्यात लोकसभा, विधानसभा निवडणुका पार पडल्यावर आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकांकडे सर्वपक्षीयांचे लक्ष केंद्रित झाले आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांची घोषणा झाली नसली तरी या निवडणुका मार्च महिन्यात अपेक्षित आहेत. यामुळे महायुतीतील सर्व घटक पक्ष तयारीला लागले असून शिंदे गटाच्या वतीने १०० जागांसाठी तयारी सुरू असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होतील, अशी परिस्थिती असली तरी आम्ही मुंबईचे पालकमंत्रिपद जाहीर होण्याची वाट पाहत आहोत. त्यानंतर खऱ्या अर्थाने मुंबईत आम्हाला प्रभाग स्तरावर काम करता येणार आहे. सध्या ८५ माजी नगरसेवक हे शिंदे गटासोबत आहेत. त्यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात आमची ताकद निर्माण झाली आहे. त्यानुसार प्रभाग स्तरावर आम्ही बैठका आणि पक्षबांधणी मजबूत करणार असल्याची माहिती सावंत यांनी दिली.

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या पातळीवर लढवल्या जाणाऱ्या निवडणुका आहेत. या निवडणुकासुद्धा आम्ही महायुती म्हणून लढण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुंबईत किमान १०० जागा लढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र, जर घटक पक्षातील अन्य कार्यकर्त्यांनी लढण्याची इच्छा व्यक्त केली आणि जर काही कारणाने स्वबळावर लढण्याचा निर्णय झाला तर आम्ही त्यासाठीही तयार आहोत, असेही सावंत यांनी स्पष्ट केले.

आमच्या पक्षाकडे महत्त्वाची खाती

आमच्या पक्षाकडे नगरविकास, सार्वजनिक बांधकाम आणि गृहनिर्माण ही तीन महत्त्वाची खाती आहेत. ज्यांचा वापर भविष्यात मुंबई शहरातील अनेक विभागांमध्ये करता येऊ शकतो. या खात्यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे करता येणे शक्य आहे. यापूर्वी आम्ही ते करून दाखवल्यामुळे जनतेचा आमच्यावर निश्चित विश्वास बसला आहे. त्यामुळे आम्हाला पालिका निवडणुकीत निश्चितच चांगल्या जागा मिळतील, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in