"नाहीतर देशातील हुकुमशाही सुरुच राहील..."खासदार अरविंद सावंतांची पंतप्रधान मोदींवर टीका
"देशात सत्ताबदल व्हायला हवा, नाहीतर देशातील हुकुमशाही सुरुच राहील, असं म्हणत शिवसेना उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. फ्री प्रेस जरनल आयोजित 'दी मुंबई डिबेट' या कार्यक्रमात ते बोलत होते. देशाची हुकूमशाहीच्या दिशेने होणारी वाटचाल, स्वायत्त संस्थांचा गैरवापर, महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जाणं, मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा होत असलेला प्रयत्न इ.गोष्टींवरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
देशात सत्ताबदल होणं गरजेचं...
देशातील हुकुमशाहीला आळा घालण्यासाठी देशात सत्ताबदल होणं गरजेचं आहे. सत्ताबदल न झाल्यास एकाधिकारशाही सुरुच राहील, देशात हुकुमशाही सुरु असल्याची एक नाही अनेक उदाहरणं मी देऊ शकतो, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, "मनिपूरमधील घटना ही भारतीय संस्कृतीसाठी खूपच गंभीर बाब आहे. आम्ही ही बाब उचलून धरली की, पंतप्रधानांनी यावर काहीतरी बोलावं आणि त्यावर तातडीनं कार्यवाही करावी. पण त्यांनी काहीच केलं नाही, म्हणून आम्ही त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल केला. पंतप्रधान आले, मोठं भाषण केलं पण मनिपूरवर फक्त २ ते ४ मिनिटेच बोलले. त्यावर आम्ही आक्षेप घेतला. तर १४६ खासदारांचं निलंबन केलं."
त्यांना गुलाम हवा होता, निवडणूक आयुक्त नव्हे...
निवडणूक आयुंक्तांच्या नेमणूकीच्या पद्धतींवरूनही त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, "आतापर्यंत निवडणूक आयुक्त एका समितीद्वारे नेमले जात होते. या समितीत पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि विरोधी पक्ष नेता असत. आता मात्र या समितीत सरन्यायाधीशांऐवजी पंतप्रधानांनी सुचवलेला कॅबिनेट मंत्री असेल. असं झाल्यामुळं साहजिकच २-१ असा निकाल लागेल. कुठं आहे लोकशाही? एक गुलाम निवडणूक आयुक्त म्हणून नेमला आहे."
"त्यांना गुलाम हवा होता, निवडणूक आयुक्त नव्हे, जो ते सांगतील तसं वागेल. हा लोकशाहीसाठी धोका आहे. तुम्हाला हे दिसत नाही का? त्यामुळं आम्हाला उद्धव ठाकरेंचा अभिमान वाटतो, ते याविरोधात ठामपणे उभे आहेत..." असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं.
महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान का?
याशिवाय महाराष्ट्रातील घटत असलेला मतदानाचा टक्का याविषयीही त्यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, 'यापूर्वीच्या निवडणूका शक्यतो एप्रिलपर्यंत घेण्यात येत होत्या. मुंबईकर शाळांना सुट्या लागल्यावर बाहेर पडतात आणि इथं गरमीही प्रचंड असते. तरीही आपण इथं मे महिन्यात निवडणूका घेत आहोत. आपल्याकडे (महाराष्ट्रात) ४८ जागा आहेत. इतर राज्य ज्यामध्ये ३९, ४० अशा जागा आहेत, त्यांच्या निवडणूका एक टप्प्यात पार पडतायत, मग महाराष्ट्रात पाच टप्पे कशासाठी?
देशाचा अभिमान असणाऱ्या स्वायत्त सर्व संस्था गुलाम-
देशातील स्वायत्त संस्थांचा होत असलेल्या गैरवापराबद्दल सावंतांनी चिंता व्यक्त केली. ईडी, सीबीआय, आयकर विभाग या संस्थांचा गैरवापर देशासाठी धोकादायक ठरणार आहेत, असं ते म्हणाले.
सरकारनं मुंबईला काय दिलं...
कोस्टल रोड उद्धव ठाकरेंमुळं साकार झाला, सरकारनं मुंबईला काय दिलं? मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. साऱ्या जगाला माहितीये, मग तुम्ही ते गुजरातला का हलवताय? असा प्रश्नही त्यांनी व्यक्त केला. महाऱाष्ट्रातील वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबस इ. प्रकल्प गुजरातला गेल्याबद्दलही त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं.