काँग्रेसला धक्का; शिवसेना भाजपचे हात बळकट

महाविकास आघाडीत अद्याप जागावाटपाच्या चर्चाही झालेल्या नाहीत. त्यातच दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून जागांवर परस्पर दावे केले जात आहेत.
काँग्रेसला धक्का; शिवसेना भाजपचे हात बळकट

प्रतिनिधी/मुंबई: काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला ‘हात’ दाखवत शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले आहे. त्यांच्यासोबत काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी देखील शिवसेनेची वाट धरली आहे. मिलिंद देवरा हे उच्चशिक्षित आहेत. तरूण आहेत. सोबतच त्यांचे वडील काँग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत नेते मुरली देवरा यांची राजकीय पुण्याईदेखील त्यांच्यासोबत आहे. यामुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडीला हा धक्का मानला जात आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे हात बळकट झाले आहेत.

महाविकास आघाडीत अद्याप जागावाटपाच्या चर्चाही झालेल्या नाहीत. त्यातच दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून जागांवर परस्पर दावे केले जात आहेत. मिलिंद देवरा दक्षिण मुंबईतून इच्छुक होते. मात्र या मतदारसंघावर या अगोदरच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने दावा केल्यानंतर मिलिंद देवरा यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. हा मतदारसंघ परंपरेनुसार काँग्रेसचा असल्याची भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतरही काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी यासंदर्भात कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने मिलिंद देवरा हे नाराज असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी रमेश चेन्निथला हे मुंबई दौऱ्यावर असताना देवरा यांनी त्यांची भेट घेत आपली भूमिका मांडली होती. त्यानंतरही पक्षाने कोणत्याही प्रकारचे ठोस आश्वासन न दिल्याने देवरा हे राजीनामा देणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता.

मिलिंद देवरा हे २००४ साली वयाच्या अवघ्या २७व्या वर्षी खासदार झाले. त्यावेळी त्यांनी भाजपच्या जयवंतीबेन मेहता यांचा १० हजार मतांनी पराभव केला होता. तसेच त्यांचे वडील मुरली देवरा हे मुंबई काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत उत्तम संबंध होते. मिलिंद देवरा यांची दिल्लीच्या वरिष्ठ वर्तुळात उठबस आहे. त्यांच्या रूपाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिल्लीत एक चांगला चेहरा मिळू शकेल. मुंबईतील मराठी मतांसोबतच गुजराती, मारवाडी मतांनादेखील देवरा यांच्या रूपाने आकर्षित करता येऊ शकते. मुंबईतील व्यापारी वर्गाची साथ देखील यामुळे शिवसेनेला मिळणार आहे.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ सध्या ठाकरे शिवसेनेच्या ताब्यात आहे. या मतदारसंघात येणाऱ्या वरळी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व खुद्द आदित्य ठाकरे करतात. त्यामुळे ठाकरे शिवसेनेसमोर आता आव्हान उभे करायला शिंदे गटाला सोपे जाणार आहे. तर दुसरीकडे शिंदे शिवसेनेची मतांची आघाडी रोखण्यासाठी ठाकरे गटाला जोर लावावा लागणार आहे. भाजपला देखील यामुळे मदतच होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in