राज्याला धक्का,वेगवान घडामोडींचा सर्वात मोठा दिवस

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याआधीच बुधवारी सायंकाळी शिंदे गटाचे बंडखोर आमदार गोव्यात दाखल झाले होते.
राज्याला धक्का,वेगवान घडामोडींचा सर्वात मोठा दिवस
Published on

शिवसेनेच्या बंडखोर गटासोबत राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार राज्यात अस्तित्वात येणार, हे जवळपास निश्चित असताना गुरूवारी सकाळपासून अनेक वेगवान आणि धक्कादायक घटना घडत गेल्या. मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे शपथ घेतील, अशी घोषणा स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी करत साऱ्या राज्याला धक्का दिला. त्यानंतर फडणवीस नाराज आल्याच्या बातम्या आल्या आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, अशी घोषणा करत दुसरा धक्का दिला.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याआधीच बुधवारी सायंकाळी शिंदे गटाचे बंडखोर आमदार गोव्यात दाखल झाले होते. गुरूवारी सकाळी सर्व बंडखोर आमदार मुंबईत दाखल होणार होते. तत्पूर्वी एकनाथ शिंदे यांनी पहिला धक्का दिला. गोव्यात बोलावलेल्या शिवसेना विधिमंडळ पक्ष सदस्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांना व्हीप बजावला. यावर शिवसेना काय निर्णय घेणार, हे पाहण्याआधीच एकनाथ शिंदे मुंबईत दाखल झाले. दुपारी चारच्या सुमारात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे बंडखोर, भाजप आणि ११ अपक्ष, छोट्या पक्षांच्या पाठींब्यावर सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांच्या भेटीला गेले. राज्यपालांची भेट घेवून आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. गेल्या आठ-दहा दिवसांतील घडामोडी पाहता देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, असे सर्वांना वाटत होते. पण कोणालाही ताकास तूर लागू न देता फडणवीस यांनीच ‘राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आजच सायंकाळी शपथ घेतील,’ अशी घोषणा केली. ही घोषणा करताना त्यांनी आपण स्वत: या सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याचेही जाहीर केले. फडणवीस यांनी दिलेला हा दुसरा धक्का होता. पण या घोषणा करताना फडणवीस हे नाराज आहेत, हे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे दिसत होते. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यात एकहाती भूमिका बजावलेले फडणवीस मुख्यमंत्री बनणार नाहीत, म्हटल्यावर सरकारवर त्यांचे नियंत्रण असेल, असे स्पष्ट होते. फडणवीस यांनी स्वत: पत्रकार बैठकीत तसा उल्लेखही केला. तरीही आता मुख्यमंत्री कोण?, असा प्रश्न सर्वांना पडला होता. फडणवीस यांनी दिलेले धक्के पचण्याआधीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी ‘देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री होतील’, अशी घोषणा केली. गुरूवारच्या दिवसभरातील धक्क्यांमध्ये हा आणखी एक मोठा धक्का होता. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद न देण्यावरून भाजपला २०१९ च्या निवडणुकीनंतर सत्तेबाहेर रहावे लागले होते. आता भाजपला सत्ता स्थापनेची, स्वत:चा मुख्यमंत्री करण्याची संधी चालून आली असताना भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय कसा घेतला, यामागे नेमके काय राजकारण आहे, याची उत्तरे आगामी राजकीय घडामोडींतच पहायला मिळतील.

logo
marathi.freepressjournal.in