
किफायतशीर दरात उपचार मिळत असल्याने हजारो रुग्ण मोठ्या आशेने मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात दाखल होतात; मात्र या रुग्णांना लागणारी औषधे रुग्णालयात न देता बाहेरून आणायला सांगितली जात आहेत. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे, असा आरोप मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. दरम्यान, पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांना पत्र दिले असून योग्य ती कारवाई करा, अशी मागणी केली आहे.
महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरवठा होत नसल्यामुळे रुग्णांना बाहेरून औषधे आणावायास सांगण्यात येते. मनपाच्या कुठल्याही रुग्णालयांमध्ये औषधाचा पुरवठा होत नाही. औषधांचे टेंडर काढण्यासाठी ७ ते ८ महिने लागत आहे. एवढा कालावधी लागत असल्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयात औषधाचा पुरवठा होत नाही. एखाद्या रुग्णास औषण न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यूही होऊ शकतो. त्याला जबाबदार कोण राहणार? महापालिकेच्या रुग्णालयात येणारे सर्व रुग्ण हे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून उपचारार्थ येतात. त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे ते महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये दाखल होतात; परंतु महापालिकेच्या सर्व रुग्णालयामध्ये औषधाचा पुरवठा नसल्यामुळे या रुग्णांना बाहेरून औषधे स्वतःच्या खर्चाने आणावी लागतात, असे रवी राजा म्हणाले.
महापालिकेच्या रुग्णालयांत औषध पुरवठा उपलब्ध होत नसल्यामुळे टेंडर मंजूर होणाकरीता लागणा-या विलंबामुळे महापालिकेच्या रुग्णालयात औषध पुरवठा होत नाही. याला महापालिका प्रशासन जबाबदार आहे, असा आरोप रवी राजा यांनी केला आहे.