ठाण्यात दहा रुपयांच्या नोटेचा तुटवडा

सध्या मुंबई, ठाण्यात दहा रुपयांच्या चलनाचा प्रचंड तुटवडा जाणवत असून व्यापारी आणि ग्राहक देखील त्रस्त झाले आहेत.
ठाण्यात दहा रुपयांच्या नोटेचा तुटवडा
Wikipedia

ठाणे : सध्या मुंबई, ठाण्यात दहा रुपयांच्या चलनाचा प्रचंड तुटवडा जाणवत असून व्यापारी आणि ग्राहक देखील त्रस्त झाले आहेत. दहा रुपये सुट्टे नसल्याने बाजारात, बसमध्ये रिक्षा प्रवासात वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. मागील अनेक दिवसांपासून चलनाच्या तुटवड्यामुळे समस्या भेडसावत आहेत. यामुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत. पूर्वीपासून येथे दहा रुपयांच्या नोटा गायब होत्या, परंतु आता तर दहा रुपयांचे नाणे देखील मिळत नसल्यामुळे नाहक व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

दहा रुपयांच्या चलनाचा कृत्रिम तुटवडा नेमका झालाय का? याबाबत मात्र माहिती मिळत नसल्याने शंकेचे निरसन करायचे कोणी बाबाबत मात्र सर्वांचेच मौन पहायला मिळत आहे. याबाबत बँकांनी देखील हात वर केले असून बँकेत देखील दहा रुपयांच्या नोटांचा भरणा कमी झाला असल्याची माहिती देण्यात येते.

मोठ्या व्यावसायिकांना याचा फटका कमी, परंतु छोट्या व्यापाऱ्यांना याचा सर्वाधिक बसत आहे. हातावर पोट असणाऱ्या रोजंदारी करणाऱ्यांना देखील दहा रुपयांच्या सुट्टे पैसे नसल्याचा त्रास होत आहे. बाजारपेठेत सर्वच ठिकाणी ग्राहकांना फिरत असताना नेहमीच किरकोळ सुट्ट्या पैशांची आवश्यकता भासत असते. अनेकवेळा फिरत असताना किरकोळ वस्तू घेताना सुट्टे पैसे लागतातच.

बरेच वेळा किरकोळ खरेदीसाठी गुगलपे, ऑनलाईन माध्यम वापरली जात असतात. परंतु अनेकवेळा प्रवास करत असताना किंवा फिरत असताना अचानक फोनची रेंज गेल्यास गैरसोय होऊन नाहक त्रास सहन करावा लागतो.

दहाच्या नोटांचा तुटवडा असल्याने व्यापारात गैरसोय निर्माण होत आहे. याबाबत शासनाने देखील गंभीर पावले उचलून हा कृत्रिम तुटवड्याचा शोध घेऊन वारंवार होणाऱ्या तुटवड्यापासून ग्राहकांना विनाकारण होत असलेल्या त्रासाची समस्या सोडवून यासाठी कायमस्वरूपी ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी व्यापारी वर्गातून केली जात आहे. गुगल पे, फोन पे सारखे विविध कंपन्यांच्या ऑनलाईन पेमेंट ॲपला प्रोत्साहन देत नसेल ना, अशी शंका बरेच व्यापारी व्यक्त करत आहेत.

कमिशनचा धंदा तेजीत

मुंबईत मोठ्या व्यापाऱ्यांना दहा रुपयांच्या चलनासाठी कमिशन द्यावे लागत आहे. मात्र सध्या कमिशन देऊन देखील दहा रुपयांचा नोटा उपलब्ध होत नाहीत. मुंबईमध्ये दहा रुपयांच्या नवीन नोटांच्या बंडलसाठी ४०० रुपये, तर जुन्या चांगल्या स्थितीतील नोटांसाठी २०० रुपये दर हजारी कमिशन सुरू असून मुंबईतील मशीद बंदर परिसरात कमिशनवर सुट्ट्या नोटा मिळण्याचा व्यवसाय जोरात सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in