मुंबईतील प्रदूषण जी-२०च्या सदस्यांना दाखवा -अबू आझमी

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली
मुंबईतील प्रदूषण जी-२०च्या सदस्यांना दाखवा -अबू आझमी

गोवंडी येथील एसएमएस कंपनीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. यामुळे येथील नागरिकांना विविध श्वसनाचे तसेच टीबी सारखे आजार होते आहेत. याबाबत गेले १० वर्षे आवाज उठवला जात आहे. मात्र त्यानंतरही येथील प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेने कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. यांच्या निषेधार्थ बुधवारी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. यावेळी मुंबईमधील प्रदूषण जी २०च्या सदस्यांना दाखवा, असे आवाहन आझमी यांनी केले आहे.

गोवंडी येथील एसएमएस कंपनीत बायो वेस्ट कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येते. या विभागात डम्पिंग ग्राउंड असल्याने आधीच येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यात आता एसएमएस कंपनीकडून होणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत गेले १० वर्षे आवाज उचलत आहे. तत्कालीन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी ही कंपनी बंद करू असे सांगितले. एक दिवस कंपनी बंद केली. त्यानंतर पुन्हा ही कंपनी सुरू झाली. पालिकेचे पैसे गेले तरी चालतील. मात्र प्रदूषण करणारे डम्पिंग ग्राउंड आणि एसएमएस कंपनी मुंबईबाहेर घेऊन जा, अशी मागणी अबू आझमी यांनी केली.

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी पालिका मुख्यालयात आयुक्तांच्या भेटीला आले. मात्र आयुक्त जी-२०मध्ये सहभागी असल्याने त्यांची भेट झाली नाही. “जी-२० साठी विविध देशातून लोक आले आहेत. त्यांना गोवंडी, डम्पिंग ग्राउंड, एसएमएस कंपनी दाखवा. येथील प्रदूषण दाखवा. मुंबईमधील सत्य त्यांना दाखवा, अन्यथा आम्ही जी-२० मध्ये घुसून येथील प्रदूषण त्यांच्या समोर आणू, असा इशारा आझमी यांनी दिला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in