मुंबईतील महालक्ष्मी मंदिराचे होणार सुशोभीकरण; ६० कोटी रुपये मंजूर

भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महालक्ष्मी मंदिर आणि परिसराचे सुशोभीकरण केले जाणार आहे. त्यासाठी लवकरच मुंबई पालिका कार्यादेश जारी करणार आहे.
महालक्ष्मी मंदिर
महालक्ष्मी मंदिरविकिपिडीया
Published on

देवश्री भुजबळ / मुंबई

भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महालक्ष्मी मंदिर आणि परिसराचे सुशोभीकरण केले जाणार आहे. त्यासाठी लवकरच मुंबई पालिका कार्यादेश जारी करणार आहे. मार्च २०२४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामासाठी ६० कोटी रुपये मंजूर केले होते. प्रशासकीय मान्यतेसाठी ही फाइल महापालिका आयुक्तांकडे आहे. या कामासाठी लवकरच कार्यादेश दिला जाईल, असे एका वरिष्ठ पालिका अधिकाऱ्याने सांगितले. ते पुढे म्हणाले की, हे काम दोन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात २५ कोटींच्या प्रकल्पाचे काम होणार असून त्यासाठी निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश भाविकांसाठी सुविधा वाढविणे हा आहे.

या कामात महालक्ष्मी मंदिराच्या आत आणि परिसराचे तसेच मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. प्रकल्पात हाती घेतल्या जाणाऱ्या काही प्रमुख कामांमध्ये मंदिराच्या परिसरात स्कायवॉक तयार करणे, पार्किंगपासून मंदिरापर्यंत जोडणारा पूल उभारणे, जोडणाऱ्या रस्त्यांचे व पदपथांचे नूतनीकरण, पादचारी वाहतुकीचे व्यवस्थापन, स्टॉल्सची पुनर्रचना, आकर्षक प्रवेशद्वार उभारणे, प्रकाशयोजना करणे आणि मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर लेझर लाइट बसवणे या कामांचा समावेश आहे.

मुंबईसह देशभरातील भाविक मोठ्या संख्येने महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी येतात. भाविकांच्या सोयी सुविधांसाठी महालक्ष्मी मंदिर आणि परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. रस्ते, प्रकाशयोजना, स्कायवॉक यांचा यात समावेश आहे.

पारंपरिक सौंदर्यशास्त्राचा समतोल राखणार

महालक्ष्मी मंदिर वारसा स्थळ असल्याने, काम सुरू करण्यापूर्वी मुंबई हेरिटेज कमिटीची मान्यता घेतली असून माती परीक्षण देखील पूर्ण झाले आहे. या सुशोभीकरणाच्या कामात मंदिराच्या पारंपरिक सौंदर्यशास्त्राचा समतोल राखून भाविकांसाठी सुविधा वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in