

मुंबई : जुना नागपाडा परिसरात श्री नागोबा मंदिर आहे. या नागोबाची सहचारिणी म्हणून नागदेवी स्ट्रीटवरील ‘श्री नागदेवी’ ओळखली जाते. ब्रिटिशांच्या काळात या भागात नागांचा वावर असल्याने या भागाला ‘नागपाडा’ नाव मिळाल्याची आख्यायिका आहे. नागदेवीच्या मंदिरामुळेच ‘नागदेवी स्ट्रीट’ हे नाव पडल्याचे स्थानिक सांगतात.
दक्षिण मुंबईत नागदेवी स्ट्रीट हा अत्यंत वर्दळीचा आणि दाटीवाटीने वसलेला भाग आहे. चिंचोळे रस्ते आणि दाटीवाटीने उभ्या असलेल्या इमारतींच्या परिसरात नागदेवी मंदिर आहे. ब्रिटिशांच्या काळात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागांचा वावर होता. हे नाग जुना नागपाडा, गोल देऊळ परिसरापर्यंत जात असत. त्यामुळे या भागांना नागांवरून नावे पडली.
नागदेवी स्ट्रीटवरील हे मंदिर ४५० ते ५०० वर्षे जुने आहे. हा भाग समुद्रात होता. ही मूर्ती स्वयंभू आहे. कोळी समाजातील लोकांनी या मंदिराची स्थापना केली. तेव्हापासून दरवर्षी नागपंचमी दिवशी याठिकाणी जत्रा भरते. मुंबईतील विविध भागातून लोक येथे येऊन देवीवर दूध वाहतात. ९२ नागदेवी मंदिर बिल्डिंगच्या तळमजल्यावर हे मंदिर आहे. देवीच्या नावावरून या इमारतीलाही नाव देण्यात आले आहे.
इमारत बनविण्यापूर्वी या ठिकाणी नागाची पिल्ले दिसत असत. दहा वर्षांपूर्वी येथील इमारत नव्याने बांधण्यात आली आहे. श्री नागदेवी मंदिराची पूजा महंत शिवकुमार दुबे गेली ४५ वर्षे अविरतपणे करत आहेत. सध्या हे मंदिर सोसायटीच्या अखत्यारित आहे. या मंदिरात श्री नागदेवी माता, हनुमान, विठ्ठल-रुक्मिणी, श्री पार्वती माता, श्री शीतला माता, शंकराची पिंड, श्री भैरवनाथ बाबा यांच्या मूर्ती आहेत.
नागपंचमी, महाशिवरात्री या दिवशी या मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. भाटिया लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. मंदिरात दिवसातून चार वेळा आरती होते. सकाळी ७ वाजता, दुपारी १२ वाजता, सायंकाळी ७.३० वाजता आणि रात्री ९.३० वाजता शेवटची आरती होऊन मंदिर बंद होते. सकाळी ५ वाजता मंदिर खुले होते, दुपारी १२ वाजता आरती झाल्यानंतर मंदिर बंद होते. त्यानंतर ४ वाजता मंदिर खुले होते.
मुंबईच्या कानाकोपऱ्यातून शेकडो भाविक आजही या मंदिरात पूजेसाठी येतात. येथे नवस पूर्ण होत असल्याची लोकांची श्रद्धा आहे. नागपंचमी, शिवरात्रीला मंदिरात दर्शनासाठी रांग लागते. भाविक दूध, नारळ देवीला अर्पण करतात.
- महंत शिवकुमार दुबे, व्यवस्थापक, श्री नागदेवी मंदिर
उद्याच्या अंकात मढची हरबा देवी