
पूनम पोळ/मुंबई
माटुंगा पश्चिम येथील २००-२५० वर्षे प्राचीन मंदिर असलेल्या श्री सात आसरा मनमाला देवी मंदिरात सात देवींचे वास्तव्य आहे. सात आसरा या जलदेवता असून ‘आसरा’ या नावाने त्या सर्वत्र प्रसिद्ध आहेत. या मंदिरात संतोषी माता देवी, कान्होपात्रा देवी, चंपावती देवी, केवडावती देवी, मनमाला देवी, जरीमरी देवी, शीतला देवी आणि खोकलादेवी या सात बहिणींसोबत कान्हो गवळी भाऊ या आठ देवांच्या मूर्ती येथे दर्शनास मिळतात. मनातल्या इच्छा पूर्ण करणाऱ्या मनमाला देवीमुळे या मंदिराला ‘सात आसरा मनमाला देवी मंदिर’ या म्हणून ओळखले जाते.
या मंदिराच्या भोवताली वड, पिंपळ आणि उंबर ही झाडे होती. परंतु, कालांतराने या झाडांचे जीवनमान संपुष्टात आल्याने ही झाडे कोसळली. मात्र, भाविक आजही या झाडांच्या मुळांची न चुकता पूजा करतात. तसेच, मंदिर परिसरात असलेल्या विहिरींमुळे आणि आजूबाजूच्या इतर झाडांमुळे या परिसरात नेहमीच थंडावा असल्याची भावना येथे येणारे भाविक व्यक्त करतात.
मंदिराचे जीर्णोद्धार व्हावे!
माटुंगा भागातील हे सर्वात जुने प्राचीन मंदिर आहे. या मंदिराची प्रचिती येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकांना येते. परंतु, या मंदिराकडे राजकीय लोकांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे. हे स्वयंभू मंदिर आहे. मुंबईतील प्राचीन मंदिरापैकी हे एक मंदिर आहे. या मंदिराचे जीर्णोद्धार होणे गरजेचे आहे. जेणेकरून या मंदिराची ख्याती सर्वदूर पसरेल. परंतु, यासाठी कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही, अशी खंत काही भाविकांनी व्यक्त केली.
तलावात सापडल्या देवींच्या ७ मूर्ती
आमच्या पूर्वजांना २५० वर्षांपूर्वी येथे असलेल्या तलावात देवींच्या ७ मूर्ती सापडल्या. तेव्हापासून हे मंदिर आहे. या मंदिरात दुरून भाविक येतात. याठिकाणी दर मंगळवार आणि शुक्रवारी भाविकांची गर्दी असते. विशेषतः नवरात्रीचे नऊ दिवस हे मंदिर भाविकांनी गजबजलेले असते. तसेच, मंदिर उभारणीसाठी आमच्या कुटुंबाने आणि मंदिरात येणाऱ्या भाविकांनी मदत केली. मंदिर उभारणीसाठी कोणत्याही राजकीय पक्षाची आम्हाला मदत लाभलेली नाही. मंदिरात असलेल्या देवींची कृपा आमच्या पाठीशी असल्यामुळे आम्हाला कधीच काही कमी पडले नाही, असे विशेष कार्यकारी अधिकारी मधुसूदन साळवी यांनी सांगितले.
येथील विहिरीतील पाण्याने काही आजार बरे होतात!
पूर्वी या ठिकाणी विहिरीच्या जागेवर तलाव होते. या तलावातून सात आसरा देवी प्रकट झाल्या. त्यामुळे विहिरीतील पाण्याला विशेष महत्त्व आहे. कांजण्या, देवीसारखे आजार झाले की सात दिवसांनी पालक आपल्या पाल्याला इथे घेऊन येतात आणि विहिरीच्या पाण्याने आंघोळ घालतात. या पाण्यामुळे कांजण्या, देवीसारखे आजार लवकर बरे होतात, असा कित्येक भाविकांचा अनुभव आहे आणि तशी सर्वत्र आख्यायिका आहे.
- प्रकाश सावंत (मंदिराचे पुजारी)
मी गेले ४५ वर्षे नित्यनेमाने या मंदिरात देवीच्या दर्शनाला येते. इथे आल्यावर मला मानसिक समाधान मिळते. मंदिर जरी छोटे असले तरी याठिकाणी मनात असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. त्यामुळे मी या मंदिरात वेळ मिळेल तशी देवींच्या दर्शनाला येते.
- शांता हंसनाळे (भाविक)
मनमाला देवी हे आमचे कुलदैवत आहे. माहीममध्ये राहत असताना मी वडिलांबरोबर दर मंगळवारी आणि शुक्रवारी येत होतो. आता माझेच वय ६५ वर्षे आहे आणि मी सध्या नालासोपारा येथे राहतो. तरीही, मला वेळ मिळेल तसा मी माझ्या नातवंडासोबत या मंदिरात येतो. मी लहान असताना जे प्रसन्न वातावरण मंदिरात होते, तेच वातावरण आता देखील आहे आणि यापुढेही तसेच राहील, असा मला विश्वास आहे.
- वामन कोळी (भाविक)