मुंबई : ऐन निवडणुकीच्या धामधुमीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईच्या माजी महापौर आणि शिव आरोग्य सेनेच्या अध्यक्षा शुभा राऊळ यांनी रविवारी ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
तत्पूर्वी, शुभा राऊळ यांनी आमदार प्रवीण दरेकर यांच्या निवासस्थानी मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. माजी महापौर शुभा राऊळ यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा पत्र दिले. त्यांनी शिव आरोग्य सेनेच्या अध्यक्षपदाचा आणि शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सुपूर्द केला. शुभा राऊळ यांच्या नाराजीचे कारण अद्याप पुढे आलेले नाही. अगदी थोडक्या शब्दांमध्ये शुभा राऊळ यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे.
शुभा राऊळ या ठाकरेंच्या शिवसेनेच्या एक मोठ्या महिला नेत्या मानल्या जातात. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी त्यांच्या युतीचा वचननामा जाहीर केला असताना त्याच दिवशी शुभा राऊळ यांनी राजीनामा दिल्याने तो ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जातोय.
शुभा राऊळ यांनी यापूर्वी शिवसेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीपूर्वी पक्षाचा राजीनामा देत मनसेत प्रवेश करून मनसेकडून विधानसभा निवडणूक लढवली होती.