सिद्धिविनायक मंदिर परिसराला नवी झळाळी; ७८ कोटी खर्च; भूमिगत पार्किंग, भिंतींचे स्टोन क्लॅडिंग; कामाचा १५ ऑगस्टपासून शुभारंभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २५ मे २०२६ रोजी भूमिपूजन करण्यात आले होते. प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसराचे सुशोभीकरण आणि श्रेणीसुधारणा करण्याच्या कामाला वेग आला आहे.
सिद्धिविनायक मंदिर
सिद्धिविनायक मंदिर
Published on

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २५ मे २०२६ रोजी भूमिपूजन करण्यात आले होते. प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसराचे सुशोभीकरण आणि श्रेणीसुधारणा करण्याच्या कामाला वेग आला आहे. पहिल्या टप्प्यात मंदिराचे ‘सिद्धी गेट’, विद्यमान भिंतींना आतील व बाहेरील बाजूस दगडी आवरण, उत्तर बाजूस छताची कॅनोपी, फरशी, विद्युत रोषणाई, प्लंबिंग व चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी ७८ कोटी १ लाख २० हजार ३८ रुपये खर्च करण्यात येणार आहे. १५ ऑगस्टपासून कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी पालिका आयुक्तांची मंजुरी १५ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात आली होती. त्यानंतर २७ जानेवारी २०२६ रोजी के.एच. कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराला कार्यादेश देण्यात आला. तर प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात सुविधा केंद्र, सुरक्षा तपासणी इमारत, दुकाने, ‘रिद्धी गेट’, बाहेर पडण्यासाठी ओव्हरब्रिजची जोडणी, कॅनोपी, फरशी, प्रकाशयोजना व प्लंबिंगची कामे प्रस्तावित आहेत. तिसऱ्या टप्प्यात अन्नदान इमारत, चौकाचा विकास व ५ ठिकाणी प्रवेशद्वार असतील.

प्रवेशद्वारांवर हायड्रॉलिक बोलार्ड आणि रोड ब्लॉकर

‘सिद्धी गेट’ आणि ‘रिद्धी गेट’सह मुख्य प्रवेशद्वारांवर मजबूत लोखंडी गेटची तरतूद करण्यात येणार आहे. दोन्ही प्रवेशद्वारांवर हायड्रॉलिक बोलार्ड आणि रोड ब्लॉकर बसविण्याची मागणी करण्यात आली असली, तरी हायड्रॉलिक बोलार्डचा समावेश सध्याच्या पहिल्या टप्प्यातील कामात करण्यात आलेला नाही. दोन्ही प्रवेशद्वारांवर वॉच टॉवर उभारण्याचे काम दुसऱ्या टप्प्यात करण्याचे प्रस्तावित आहे.

पार्किंगच्या बांधकामानंतर १४,९०० चौमीचे मैदान उपलब्ध होणार

प्रस्तावित भूमिगत पार्किंगसाठी नर्डुल्ला टँक मैदानातील सुमारे २,६०१ चौ.मी. जागा बांधकामाच्या काळात तात्पुरती वापरली जाणार आहे. पार्किंगच्या बांधकामानंतर सुमारे १४,९०० चौ.मी. क्षेत्रफळाचे मैदान उपलब्ध राहणार असल्याचे सादरीकरणात नमूद करण्यात आले आहे. पार्किंगनंतर ये-जा करण्यासाठी सुमारे १,१०० चौ.मी. क्षेत्राचा मार्ग प्रस्तावित आहे.

मंदिर सुरक्षेसाठी सीसीटीव्ही, अँटी-ड्रोन गन

मंदिराच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस विभागाने विविध सूचना केल्या आहेत. मंदिर परिसरातील सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष, महिला पोलिसांसाठी स्वतंत्र कक्ष, एसआरपीएफ कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था, कॉन्फरन्स रूम, स्टोअर रूम आणि अँटी-ड्रोन गनची तरतूद दुसऱ्या टप्प्यातील सुविधा केंद्रात करण्याचे नियोजन आहे. मंदिराच्या बाहेरील परिसरातही सीसीटीव्ही बसविण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in