मुंबई ते ठाणे प्रवास आता सिग्नल फ्री; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते 'या' उड्डाणपुलांचे लोकार्पण

दक्षिण मुंबईतून 'फ्री वे' वरून येणारी वाहतूक आता छेडानगर सिग्नलला न थांबता अधिक वेगाने ठाण्याच्या दिशेने जाऊ शकेल, यामुळे वाहतुकीच्या वेळेत मोठी बचत होणार
मुंबई ते ठाणे प्रवास आता सिग्नल फ्री; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते 'या' उड्डाणपुलांचे लोकार्पण
@mieknathshinde

मानखुर्दवरून ठाण्याकडे जाणाऱ्या छेडा नगर येथील १.२३ किमी लांबीचा दोन पदरी उड्डाणपूल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या उड्डाणपुलामुळे मानखुर्दवरून ठाण्याकडे जाणारी वाहतूक आता सिग्नल मुक्त होणार आहे. दक्षिण मुंबईतून 'फ्री वे' वरून येणारी वाहतूक आता छेडानगर सिग्नलला न थांबता अधिक वेगाने ठाण्याच्या दिशेने जाऊ शकेल, यामुळे वाहतुकीच्या वेळेत मोठी बचत होणार आहे.

मानखुर्द ते ठाणे दिशेकडील छेडानगर जंक्शन येथील उड्डाणपूलाचा तसेच सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड विस्तार प्रकल्पातील कपाडिया नगर ते वाकोला जंक्शन या उन्नत मार्गाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यामुळे आता पूर्व द्रुतगती महामार्गावरील नवी मुंबईवरून ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरळीत होऊन नवीमुंबई वरून येणारी वाहने आता विनाव्यत्यय ठाण्याच्या दिशेने प्रवास करतील. सांताक्रुज चेंबूर जोड रस्ता आणि पूर्वद्रुतगतीमार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई उपनगरांतील तसेच नवीमुंबई वरून मुंबई ठाण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीमुळे घाटकोपर येथील छेडा नगर जंक्शनवर मोठ्याप्रमाणात वाहतूकोंडी होत असे. ही वाहतूकोंडी कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत छेडा नगर जंक्शन सुधारणा प्रकल्प हाती घेतला आहे. त्या अंतर्गत एकूण तीन उड्डाणपूल आणि एक भुयारी मार्ग बांधण्यात येत आहेत या प्रकल्पासाठी २२३.८५ कोटी इतका खर्च करण्यात येणार आहे. या प्रकल्पातील सांताक्रूझ चेंबूर जोडरस्त्याला जोडणाऱ्या उड्डाणपूल हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तसेच गुरुवारी लोकार्पण करण्यात आलेल्या उड्डाणपूला करिता ८६.३३ कोटी इतका खर्च करण्यात आला आहे.

पूर्व-पश्चिम द्रुतगती महामार्गाची जोडणी आणखी गतिमान

सांताक्रूझ चेंबूर जोडरस्ता विस्तार प्रकल्पाच्या पहिल्या भागातील कुर्ला ते वाकोला, रझाक जंक्शन पर्यंत ३.०३ किमी लांबीचा उन्नत मार्गाचे लोकार्पण करून गुरुवारी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या उन्नत मार्गाच्या दोन मार्गिकांचे तसेच एमटीएनएल आर्मचे लोकार्पण केले होते. बीकेसी आणि कुर्ला भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी, तसेच विद्यमान सांताक्रूझ चेंबूर रस्त्या द्वारे पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाना जोडण्यासाठी एमएमआरडीए राज्य शासनाच्या सहकार्याने सांताक्रूझ चेंबूर जोडरस्ता प्रकल्पाचा विस्तार दोन भागात करत आहे. यानुसार पहिल्या भागात ५.९ किमीचा उन्नत मार्ग असेल. सदर प्रकल्पाअंतर्गत बिकेसीच्या सभोवतालचे रस्ते विकसित करण्यात येत आहेत. तसेच ते पुर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडले जाणार आहेत, यामुळे मुंबईचे व्यवसाय केंद्र असलेल्या बीकेसी भागात होणारी वाहतूक कोंडी नक्कीच कमी होईल. तसेच दोन्ही द्रुतगतीमहामार्गांना एकमेकांशी जोडणाऱ्या या सिग्नल विरहित डबल डेक्कर उन्नतमार्गामुळे वाहतुकीच्या वेळेत जवळपास ४५ मिनिटांची बचत होईल.

logo
marathi.freepressjournal.in