शिवसेनेला मुंबई महापालिकेतही झटका बसण्याची चिन्हे

शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे एकनाथ शिंदे यांनी बंडाचे हत्यार उपसले आहे
शिवसेनेला मुंबई महापालिकेतही झटका बसण्याची चिन्हे
Published on

शिवसेनेतील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली असून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी शिवसेनेलाच गॅसवर ठेवले आहे. आमदार, खासदारांच्या समर्थनानंतर मुंबई महापालिकेतील २० ते २५ नगरसेवकांनी बंडाचे हत्यार उपसण्याचा निर्णय घेतल्याचे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात आले. तसेच मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी निर्णय घेऊ, असा इशारा शिंदे समर्थक नगरसेवकांनी दिल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शिवसेनेला मुंबई महापालिकेतही झटका बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे एकनाथ शिंदे यांनी बंडाचे हत्यार उपसले आहे. बंडाचे हे शिंदे नावाचे वादळ मुंबई महापालिकेतही धडकण्याची भीती शिवसेना नेत्यांना सतावू लागली आहे. शिवसेना उपनेते व माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी व आमदार यामिनी जाधव सध्या एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत. त्यामुळे यशवंत जाधव यांच्या संपर्कातील अन्य नगरसेवक शिंदे यांच्या समर्थनार्थ येतील, असे सेनेतील वरिष्ठ नेत्याने सांगितले. तर बोरिवली येथील आमदार प्रकाश सुर्वे हेदेखील शिंदे यांच्या बरोबर आहेत. प्रकाश सुर्वे यांच्या संपर्कातील नगरसेवक मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी बंडाचे हत्यार उपसतील, अशी भीती सेना नेत्यांनी व्यक्त केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in