
मॉलमध्ये वाईन विक्री पुन्हा सुरू होण्याचे संकेत आहेत. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने या वर्षाच्या सुरूवातीला सुपर मार्केट तसेच वॉक इन स्टोअर मधून वाईन विक्रीचा निर्णय घेतला होता; मात्र त्याला भाजपकडून जोरदार विरोध झाला होता. या प्रकरणी सर्वसामान्य लोकांकडून सूचना देखील मागविण्यात आल्या होत्या. आता या सूचना राज्य सरकारला प्राप्त झाल्या असून त्याचा आधी आपण स्वत: अभ्यास करणार आहोत. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू व नंतर मंत्रिमंडळासमोर जाऊ, अशी माहिती उत्पादनशुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. थेट शेतकऱ्यांनीच वाईन उत्पादन केले तर ते शेतकऱ्याच्या हिताचे ठरेल, असेही ते म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारने राज्यात मॉलमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला होता; मात्र राज्य सरकारच्या या निर्णयाला तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या भाजपने जोरदार विरोध केला होता. तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवायला सरकार निघाले असल्याची टीका केली होती. आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार या भाजप नेत्यांनी देखील मॉलमध्ये वाईन विक्रीला जोरदार विरोध केला होता; मात्र राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना फायदा व्हावा, तसेच वाईन उद्योगाला चालना मिळावी, यासाठीच आपण हा निर्णय घेतला असल्याचे समर्थन तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी केले होते.
आता याबाबत माहिती देताना उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले की, ‘‘मॉलमधून वाईन विक्रीसंदर्भात लोकांच्या हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत त्या राज्य सरकारला प्राप्त झाल्या आहेत. आता त्याची वर्गवारी करण्यात येत आहे. शहरी, ग्रामीण तसेच बाजूने आणि विरोधात, अशी वर्गवारी करण्यात येईल. त्यानंतर मी त्याचा अभ्यास करणार आहे. त्यानंतर आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू. नंतर मंत्रिमंडळासमोर जाऊ.’’