कर्नाक पुलाचे ‘सिंदूर’ असे नामकरण ; मुख्‍यमंत्र्यांच्या हस्‍ते उद्या होणार पुलाचे लोकार्पण

मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि'मेलो मार्गाला जोडणाऱ्या सिंदूर (पूर्वीचे कर्नाक) रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण उद्या दिनांक १० जुलै रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.
कर्नाक पुलाचे ‘सिंदूर’ असे नामकरण ; मुख्‍यमंत्र्यांच्या हस्‍ते उद्या होणार पुलाचे लोकार्पण
Published on

मुंबई : मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि'मेलो मार्गाला जोडणाऱ्या सिंदूर (पूर्वीचे कर्नाक) रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण १० जुलै रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. या लोकार्पण सोहळा मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या हस्‍ते व उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजितदादा पवार, विधानसभा अध्‍यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्‍या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

राज्‍याचे माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा तसेच स्थानिक खासदार अरविंद सावंत, आमदार सुनिल शिंदे, आमदार श्राजहंस सिंह, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्यासह विविध मान्यवरांची या सोहळ्यास उपस्थिती असणार आहे.

दक्षिण मुंबईतील वाहतुकीसाठी सिंदूर (पूर्वीचे कर्नाक) पूल महत्त्वाचा आहे.

असा बांधला आहे पूल

या पुलाची एकूण लांबी ३२८ मीटर असून रेल्वेच्या हद्दीत ७० मीटर इतकी आहे. महानगरपालिका ह‌द्दीतील पोहोच रस्‍त्‍याची एकूण लांबी २३० मीटर असून पूर्वेस १३० मीटर व पश्चिमेस १०० मीटर इतकी आहे. लोहमार्गावरील पुलाच्‍या उभारणीकामी आरसीसी आधारस्तंभ यावर प्रत्येकी ५५० मेट्रिक टन वजनी ७० मीटर लांब, २६.५० मीटर रूंद आणि १०.८ मीटर उंचीच्‍या दोन तुळया स्‍थापित करण्‍यात आल्‍या आहेत. आरसीसी डेक स्लॅब, डांबरीकरण, महानगरपालिकेच्या ह‌द्दीतील पूर्व आणि पश्चिम बाजूचे पोहोच रस्ते इत्यादी कामे पूर्ण झाली आहेत.

logo
marathi.freepressjournal.in