मुंबई : गृहनिर्माण प्रकल्पात आर्थिक गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी महारेराने कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. विकासकांना आता एकाच बँकेत खाते उघडावे लागणार आहे. अनुपालन हमी, कार्यक्षमता, पारदर्शकता, जबाबदेयता वाढून खात्यांच्या वापरात समानता यावी, यासाठी एकाच अनुसूचित बँकेत, एका प्रकल्पाचे ‘संचलन खाते’, ‘विभक्त खाते’ आणि ‘व्यवहार खाते’ असे ३ खाते ठेवणे विकासकांना बंधनकारक केले आहे. घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या हितासाठी महारेराने हा निर्णय घेतला आहे.
घर खरेदीदाराचे हित अधिक सुरक्षित आणि संरक्षित व्हावे, यासाठी गृहनिर्माण प्रकल्पाच्या आर्थिक व्यवहारात अंगभूत शिस्त अतिशय महत्त्वाची आहे. यासाठी महारेराने आता बँक खात्यात विकासकाचे नाव, प्रकल्पाचे नाव याच नावावर काढायचे आहेत. हे खाते उघडताना बँकेने हा संबंधित विकासकाचा तपशील महारेराच्या संकेतस्थळावरून पडताळून घ्यायचा आहे. शिवाय हा प्रकल्प पूर्ण होण्याच्या तारखेला या खात्यातील सर्व व्यवहार थांबवायचे आहेत. प्रकल्पाला महारेराने मुदतवाढ दिल्याशिवाय त्या खात्याचा वापर करता येणार नाही. विकासकाला प्रधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीशिवाय बँक खाते बदलता येणार नाही.
विभक्त खाते हे स्थावर संपदा अधिनियम २०१६ कलम (४),(२),(आय), (डी) मधील तरतुदीनुसार प्रकल्पाची जमीन आणि बांधकामावरील खर्चासाठी किमान ७० टक्के रक्कमेसाठी राहील. विकासकाने संचलन खात्यातून घरखरेदीदारांकडून वेळोवेळी येणाऱ्या पैशातून किमान ७० टक्के रक्कम विभक्त खात्यात आणि जास्तीत जास्त ३० टक्के रक्कम व्यवहार खात्यात नियमितपणे वळती होण्यासाठी बँकेला स्थायी लेखी सूचना देऊन ठेवायच्या आहेत.
या खात्यातून धनादेश, ऑनलाईन बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा इतर कुठल्याही पद्धतीने पैसे काढले जाऊ नये, असे महारेराने सुचवले आहे. घर खरेदीदारांना नोंदणी पत्र देताना खरेदीकरार करताना विभक्त खात्यातील रकमांचा उल्लेख बंधनकारक आहे.
...म्हणून घेतला निर्णय!
विकासक ग्राहकांकडून वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे घेतात व वेगवेगळ्या खात्यात जमा करतात. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. मात्र या नवीन प्रस्तावात ग्राहकांकडून जमा होणारे, फक्त सरकारी कर, चार्जेस वगळून, सर्व पैसे मग ते पार्किंगसाठी असोत की किंवा सुविधांसाठी असोत ते एकाच खात्यात जमा करावे लागतील. शिवाय या खात्याचा क्रमांक विक्री करारामध्ये नमूद करणेही बंधनकारक आहे. घर खरेदीदारांकडून घेतला जाणारा पैसा फक्त या खात्यातच जमा करणे बंधनकारक राहील.
ग्राहक हिताला प्राधान्य देत अंतिम निर्णय!
"स्थावर संपदा क्षेत्रात पारदर्शकता, जवाबदेयता येऊन त्याची विश्वासार्हता वाढावी यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. महारेराने या आर्थिक व्यवहाराचे आणखी सूक्ष्म संनियंत्रण करता यावे यासाठी एकाच बँकेत संचलन, विभक्त आणि व्यवहार खाते प्रस्तावित केले आहे. घर खरेदीदारांकडून येणारा पैसा इतरत्र वापरला जाऊ नये, हा हेतू असून तो एकाच खात्यात पूर्णपणे जमा करण्याची तरतूद करून तो विभक्त आणि व्यवहार खात्यात केवळ स्थायी निर्देशाद्वारेच वितरित केला जावा, असेही हेतुत:च बंधनकारक केलेले आहे. सूचना, हरकतींचा कालावधी संपल्यानंतर आलेल्या सूचनांचा साकल्याने विचार करून, ग्राहकहिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल." - अजोय मेहता, अध्यक्ष, महारेरा