सायन पुलावर हातोडा चालवण्यास तूर्तास स्थगिती; राहुल शेवाळे यांच्या सूचनेनंतर निर्णय; स्थानिक जनतेला विश्वासात घेण्याची विनंती

शनिवारपासून पूल पाडकामाला तूर्तास स्थगिती दिल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी सांगितले.
सायन पुलावर हातोडा चालवण्यास तूर्तास स्थगिती; राहुल शेवाळे यांच्या सूचनेनंतर निर्णय; स्थानिक जनतेला विश्वासात घेण्याची विनंती

मुंबई: मध्य रेल्वेच्या सायन स्थानकातील ११० वर्षें जुना रोड ओव्हर पूल पाडून नव्याने पुनर्बांधणी करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यासाठी शनिवारपासून पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार होता. पूल वाहतुकीसाठी बंद केला तर वाहतूककोंडीची मोठी समस्या निर्माण होईल. त्यामुळे जनतेला विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याविषयी बैठक आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय स्थगित करावा, अशी सूचना मध्य रेल्वे व पालिकेला शेवाळे यांनी केली होती. त्यामुळे शनिवारपासून पूल पाडकामाला तूर्तास स्थगिती दिल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी सांगितले.

सायन स्थानकावरील रोड ओव्हर ब्रीजच्या पाडकामाला तूर्तास स्थगिती देण्याची सूचना शिवसेना शेवाळे यांनी रेल्वे व मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांना केली. स्थानिक जनतेचा विकासाला विरोध नाही, मात्र कोणतीही कारवाई करताना स्थानिक जनतेला विश्वासात घ्या, अशी विनंती त्यांनी यावेळी केली. या संदर्भात शेवाळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मध्य रेल्वे, मुंबई महानगरपालिका एफ (उत्तर), जी (उत्तर) विभाग, रस्ते व वाहतूक विभाग आणि पुल विभाग, तसेच वाहतूक पोलीस विभाग यांचे वरिष्ठ अधिकारी आणि धारावीतील स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर रोड ओव्हर पूल पाडण्यास तूर्तास स्थगिती दिली असून याबाबत लवकरच पुढील निर्णय घेण्यात येईल, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

‘असा’ असेल नवीन पूल

नवीन उड्डाणपूल हा ‘सिंगल स्पॅन सेमी-थ्रू गर्डर्स (२)’ ४९ मीटर लांबीचा आणि २९ मीटर रुंदीचा आरसीसी स्लॅब पद्धतीचा पूल असेल.

४९ कोटींचा खर्च : मध्य रेल्वेने

महानगरपालिकेच्या समन्वयाने सायन रेल्वे स्थानकातील रोड ओव्हर पुलाचे पुनर्बांधणी व नवीन रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन रोड ओव्हर पूल बांधणीसाठी मध्य रेल्वे २३ कोटी रुपये तर नवीन रस्ता बांधण्यासाठी मुंबई महापालिका २६ कोटी रुपये खर्च करणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in