

मुंबई : पूर्व व पश्चिमेला जोडणारा सायन उड्डाणपूल कामाला गती मिळाली आहे. पादचाऱ्यांना पूर्व-पश्चिमेला ये-जा करण्यासाठी पादचारी पूल कार्यान्वित करण्यात आला आहे. दोन भुयारी पादचारी मार्गांपैकी एक भुयारी पादचारी मार्ग पूर्ण झाला आहे. येत्या पंधरवड्यात तो कार्यान्वित करण्यात येईल. याच पद्धतीने महापालिका आणि रेल्वे प्रशासनामार्फत केली जाणारी कामे अधिकाधिक समांतर पद्धतीने करावीत, असे निर्देश अतिरिक्त पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. १५ जुलैपर्यंत शीव उड्डाणपुलाची सर्व कामे पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे बांगर यांनी स्पष्ट केले.
शीव पुलाचे रेल्वे हद्दीतील काम रेल्वे विभाग आणि पोहोच मार्ग, दोन पादचारी भुयारी मार्ग आदींचे काम महापालिका करत आहे. लाल बहादूर शास्त्री मार्गावरील भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. अभियंते, अधिकारी यांनी दररोज कार्यस्थळी उपस्थित राहावे, असे निर्देश बांगर यांनी यावेळी दिले. यावेळी पालिकेचे प्रमुख अभियंता उत्तम श्रोते, उपप्रमुख अभियंता राजेश मुळ्ये, मध्य रेल्वेचे उपमुख्य अभियंता रोहित मेहला यांच्यासह अभियंते उपस्थित होते.
चारही टप्प्यांसाठी सूक्ष्म नियोजन
पश्चिमेकडील कामाचे ४ टप्पे असून या चारही टप्प्यांच्या पूर्णत्वाचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले तसेच त्यांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली. एकंदरीतच, पश्चिम बाजूची सर्व कामे ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण केली जातील. रेल्वे प्रशासनाकडून ३१ मे २०२६ पर्यंत पूर्व बाजूचा पोहोच रस्त्याचा ताबा महापालिकेला मिळणे अपेक्षित असल्याने उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी त्यानंतर आणखी काही कालावधी आवश्यक आहे. त्याचा विचार करता या पुलाची सर्व कामे १५ जुलैपर्यंत पूर्ण केली जातील व पूल वाहतुकीला खुला केला जाईल, असे बांगर यांनी नमूद केले.
शेवटचा गर्डर ३१ मे पर्यंत बसवणार
धारावी बाजूकडील दुसऱ्या भुयारी मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. रेल्वे रुळावरील जुन्या पुलाच्या उत्तरेकडील भागाचे निष्कासन करण्यात आले आहे. आता दक्षिणेकडील भागाचे निष्कासन सुरू आहे. उत्तर दिशेच्या अर्ध्या बाजूवर तुळया स्थापित (गर्डर लॉन्चिंग) केल्यावर पूर्व बाजूचा अर्धा पोहोच रस्ता महापालिकेच्या ताब्यात येईल. रेल्वे प्रशासनामार्फत शेवटची तुळई बसवण्याचे काम ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण केली जाईल. तोपर्यंत महानगरपालिकेमार्फत पश्चिम बाजूची सर्व कामे केली जातील. मात्र, पूर्व बाजूची कामे पूर्ण करण्यासाठी सुमारे ३० ते ४५ दिवसांचा कालावधी लागेल. म्हणजेच १५ जुलैपूर्वी या उड्डाणपुलाची सर्व कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.