आजपासून सायन उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद: नवीन पूल, नवीन रस्त्याचे बांधकाम; वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग

मध्य रेल्वेने महानगरपालिकेच्या समन्वयाने सायन रेल्वे स्थानकातील रोड ओव्हर पुलाची पुनर्बांधणी व नवीन रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
आजपासून सायन उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद: नवीन पूल, नवीन रस्त्याचे बांधकाम; वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग

मुंबई : ११० वर्षे जुना ब्रिटिशकालीन सायन उड्डाणपूल पाडून नव्याने बांधण्यात येणार आहे. जुना पूल पाडण्याचे काम शुक्रवारपासून हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवार १९ जानेवारीपासून सायन रेल्वे स्थानकातील रोड ओव्हर पूल वाहतुकीसाठी पूर्णत: बंद करण्यात येणार आहे. नवीन पुलाची पुनर्बांधणी व नवीन रस्ते कामासाठी मध्य रेल्वे व मुंबई महापालिका तब्बल ४९ कोटी रुपये खर्च करणार आहे.

दरम्यान, सायन रोड ओव्हर पूल वाहतुकीसाठी बंद केल्यानंतर चेंबूर येथून येणारी वाहतूक वांद्रे-कुर्ला संकुल येथून तर दक्षिण मुंबईतून येणारी सायन रुग्णालयाजवळील छोटा सायन हॉस्पिटलजवळून वळवण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेने महानगरपालिकेच्या समन्वयाने सायन रेल्वे स्थानकातील रोड ओव्हर पुलाची पुनर्बांधणी व नवीन रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन रोड ओव्हर पूल बांधणीसाठी मध्य रेल्वे २३ कोटी रुपये तर नवीन रस्ता बांधण्यासाठी मुंबई महापालिका २६ कोटी रुपये खर्च करणार आहे.

सायन रेल्वे स्थानकातील रोड ओव्हर पूल धोकादायक झाल्याचा रिपोर्ट इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेने दिला होता. तसेच संस्थेने विद्यमान उड्डाणपूल पाडून स्टील गर्डर आणि आरसीसी स्लॅबसह नवीन शीव उड्डाणपूल पुनर्बांधणी करण्याची शिफारस केली. तसेच, विद्यमान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कुर्ला दरम्यानच्या प्रस्तावित पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या कामात अडथळा निर्माण होत असल्याने जुना उड्डाणपूल पाडून पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे, असेही संस्थेने रिपोर्टमध्ये नमूद केले आहे. त्यामुळे शुक्रवार, १९ जानेवारी रोजी जुना रोड ओव्हर पूल पाडून नव्याने पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला असून पुढील २४ महिन्यांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, या कामासाठी लवकरच ब्लॉक घेण्यात येणार असून या महत्त्वपूर्ण कामास सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

या बस मार्गांना वळसा

बेस्टचे प्रस्तावित मार्ग

धारावी व कुर्ला आगार येथून राणी लक्ष्मीबाई चौक येथे येणारे बसमार्ग ७ मर्यादित, ११ मर्यादित, २२ म., २५ म., १८१, २५५ म., ३१२, ३४१, ३४८ म., ४११ हे बसमार्ग सायन स्टेशनहून पिवळा बंगला, माहीम फाटकमार्गे लोकमान्य टिळक रुग्णालय येथे जातील.

काही बसमार्ग एसी १०, २७, ३५२, सी ३०५ हे सायन बस स्थानकात खंडित करण्यात येतील.

चेंबूरहून वांद्रे येथे जाणारे ए ३७५, ए ३७६ , ३५५ म , ३५६ म, सी ५०५ हे बसमार्ग प्रियदर्शनीहून थेट बीकेसी कनेक्टरहून बीकेसी, कलानगरमार्गे जातील.

ए सी ७२ , १७६ व ४६३ या बस काळाकिल्ला आगाराहून सुटतील व थेट सायन स्टेशनमार्गे धारावी मार्केट येथून जातील.

दरम्यान सायन येथील उड्डाणपूल नव्याने सुरू होत नाही तोपर्यंत दुचाकी व तीन चाकी वाहनांना बीकेसी कनेक्टरवरून प्रवास करू देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

असा असेल नवीन पूल

नवीन उड्डाणपूल हा ‘सिंगल स्पॅन सेमी-थ्रू गर्डर्स (२)’ ४९ मीटर लांबीचा आणि २९ मीटर रुंदीचा आरसीसी स्लॅब पद्धतीचा पूल असेल.

logo
marathi.freepressjournal.in