

मुंबई : मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्णांची गर्दी असते. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना वैद्यकीय सेवेसाठी शुल्क आदा करावे लागतात. यामुळे वेळ जाता असल्याने रुग्णालयात डिजिटल पेमेंटसाठी डिजिटल पॉज मशीन उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देश मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा लवंगारे यांनी दिले तसेच रुग्णालयात हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम यंत्रणेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
शीव (सायन) येथील लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालयात क्षमतावाढ प्रकल्प राबवण्यात येत आहे. लवंगारे यांनी शनिवारी रुग्णालयाला भेट देऊन क्षमतावाढ प्रकल्प कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. रुग्णालयातील आपत्कालीन विभाग, विविध कक्ष, एमआयसीयू, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष आदी ठिकाणी त्यांनी भेट दिली. एक्स-रे, एमआरआय, बाह्य रुग्ण विभागांचा केस पेपर, वैद्यकीय सेवांचे शुल्क अशा विविध प्रकारच्या वैद्यकीय सेवांसाठी रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांना रोख स्वरूपात पैसे अदा करावे लागतात. त्या ठिकाणी डिजिटल पेमेंट करण्यासाठी पॉज मशीन उपलब्ध करत डिजिटल पेमेंटसाठी स्वतंत्र खिडकी उपलब्ध करून देण्यात यावी. जेणेकरून रुग्णालयात लागणारी रांग कमी होण्यासाठी मदत होईल. डिजिटल पेमेंटमुळे नागरिक, रुग्ण तसेच रुग्णांचे नातेवाईक यांना सुलभ पर्याय उपलब्ध होणार असल्याचे लवंगारे यांनी सांगितले. उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, उपायुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. शैलेश मोहिते, सहायक आयुक्त (एफ उत्तर) अरुण क्षीरसागर यांच्या सह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
रुग्णालयातील पदपथ अडथळा मुक्त करा !
रुग्णालयात नागरिकांच्या प्रवेशाच्या ठिकाणी तसेच रुग्णालय परिसरात नागरिकांना चालण्यासाठी अडथळामुक्त पदपथ उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या तसेच नियंत्रण कक्षाच्या ठिकाणी नियमितपणे कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
कर्मचाऱ्यांवर सीसीटीव्हीचा वॉच
रुग्णालयात कार्यरत कर्मचारी वर्गावर सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात यावे. जेणेकरून वेळे आधी रुग्णालयातून बाहेर पडणाऱ्या कर्मचारी वर्गावर लक्ष ठेवता येईल. मुंबई महानगरपालिका मुख्यालयात मानव संसाधन विभागाच्या वतीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कर्मचारी वर्गाच्या उपस्थितीबाबत निगराणी ठेवण्यात येत आहे. नियंत्रण कक्षातून पब्लिक ॲड्रेस सिस्टिमची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत, असेही निर्देश त्यांनी दिले.
निवासी डॉक्टर, कर्मचाऱ्यांसाठी विरंगुळ्याची ठिकाणे तयार करा
मुख्य रुग्णालय इमारत (टप्पा क्रमांक - २ अ), ऑन्कोलॉजी इमारत इत्यादी ठिकाणी प्राजक्ता वर्मा लवंगारे यांनी कामांची पाहणी केली. तसेच प्रकल्पाच्या स्थितीचा आढावा घेतला. नव्याने विकसित होणाऱ्या रुग्णालयात नागरिक तसेच रुग्णालयातील निवासी डॉक्टर व कर्मचारी यांच्यासाठी विरंगुळ्यासाठी ठिकाणे तयार करावीत, असे निर्देश वर्मा लवंगारे यांनी दिले.
श्वान, मूषकांचा उपद्रव रोखा
रुग्णालयाच्या ठिकाणी नियमित स्वच्छतेसाठी प्राधान्य देतानाच कर्मचारी वर्गाला विशिष्ट युनिफॉर्म परिधान करण्यासाठी द्यावेत तसेच रुग्णालयात मूषक व श्वान यांचा उपद्रव राहणार नाही, या दृष्टीने उपाययोजना कराव्यात. रुग्णालयात हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम यंत्रणेची अंमलबजावणी करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.