

मुंबई : सायन रुग्णालयाचा दोन टप्प्यात पुनर्विकास होत आहे. दुसऱ्या टप्प्यातील इमारतीत कर्करोग रुग्णांसाठी अद्ययावत स्वतंत्र इमारत, १२ आपत्कालीन ऑपरेशन थिएटर, सोनोग्राफी, तीन हजारांहून अधिक बेड्स, सँपल जलदगतीने पाठवता यावे यासाठी प्रथमच न्यूगमॅटिक शूट प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. सायन येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय पुनर्विकास अंतर्गत, दुसऱ्या टप्प्यातील रुग्णालय इमारतीचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी दुपारी २ वाजता लोकमान्य टिळक रुग्णालय, येथे आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली हा भूमिपूजन सोहळा होणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या सर्वच रुग्णालयांत देशाच्या कानाकोप-यातून येणा-या असंख्य रुग्णांना अत्यंत माफक दरात वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यात येतात. यासाठी रुग्णालयांमध्ये सातत्याने अद्ययावत सेवा-सुविधा पुरविल्या जातात. याचाच एक भाग म्हणून शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाचाही दोन टप्प्यात पुनर्विकास करण्यात येत आहे.
अल्पदरात उपचार
त्याबरोबरच पेट स्कॅन, एमआरआय, सीटी स्कॅन अशा अत्याधुनिक मशिनद्वारे निदान सुविधा, ब्रॅकीथेरपी, रेडिओथेरपी, केमोथेरपी सारख्या सेवा पुरविण्यात येतील. कर्करुग्णांसाठी शासनाच्या विविध योजना अंतर्गत मोफत / महानगरपालिकेने ठरवून दिलेल्या अल्पदारात उपचार करण्यात येतील.
कर्करोग रुग्णांसाठी १३ मजली स्वतंत्र इमारत!
कर्करोगाच्या उपचारांसाठी देशभरातून मोठ्या संख्येने रुग्ण मुंबईमध्ये येतात. शिवाय ही उपचार प्रक्रिया अत्यंत खर्चिक व दीर्घकालीन आहे. यामुळे कर्करोगाच्या सर्वसमावेशक उपचारासाठी लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वधारण रुग्णालय परिसरात १३ मजली एक स्वतंत्र इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीत २०० रुग्णशय्या असतील.