
मुंबई : अनेक गणेशोत्सव मंडळे सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षी गणेशोत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. मात्र सायन कोळीवाडा येथील सरदारनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ भक्तांच्या देणगीमधून जमा होणाऱ्या रकमेतून सायन रुग्णालयाला विविध वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देत आहे. त्याचबरोबर गोरगरीब रुग्णांच्या औषधोपचाराचा खर्चही मंडळाकडून उचलण्यात येत असल्याने हे मंडळ अनेकांसाठी वरदान ठरत आहे.
सायन कोळीवाडा येथील सरदारनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना १९५९ रोजी झाली. तेव्हापासून हे मंडळ गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करत आहे. यंदा मंडळाचे ६७ वे वर्ष आहे. विभागातील जुने मंडळ असल्याने या मंडळाला परिसरात सायनचा राजा म्हणून ओळखले जाते. गणेशोत्सव साजरा करण्याबरोबर मंडळ विविध सामाजिक उपक्रम देखील राबवत आहे.
२६ जुलै रोजी मुंबईत झालेल्या प्रलयकारी पावसावेळी प्रतीक्षानगरमध्ये पाणी भरले होते. त्यामुळे पाणी घरात शिरलेल्या रहिवाशांना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जेवण उपलब्ध करून दिले होते. तसेच कोरोना काळात वैद्यकीय शिबिरे आयोजित करून विभागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी पुढाकार घेतला. तसेच आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या गरजू नागरिकांना कोरोना काळात रुग्णवाहिका उपलब्ध करून हॉस्पिटलमध्ये पोहचविण्यात मंडळाने मोठे काम केले.
सर्वधर्म सामावून घेणारे मंडळ
मंडळ गरीब विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके, तर गरीब रुग्णांना औषधे उपलब्ध करून देतात. इयत्ता पाचवी ते पदवीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन त्याचा गौरव करण्यात येतो. या मंडळामध्ये हिंदू, मुस्लिम व ख्रिश्चन असे सर्व जाती धर्माचे लोक आहेत. सामाजिक सलोख्यात हा उत्सव साजरा करण्यात येत असल्याचे मंडळाचे खजिनदार राजेश सावंत, सचिव रॉबिन कुमार शिवशंकर यांनी सांगितले.