
मुंबई : केवायसी अपडेटच्या नावाने एका वयोवृद्धाची अज्ञात सायबर ठगाने सुमारे साडेसहा लाखांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना विक्रोळी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून अज्ञात सायबर ठगाचा शोध सुरू केला आहे. ६४ वर्षांचे तक्रारदार सोमवारी दुपारी ते त्यांच्या घरी असताना त्यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करून तो त्यांच्या बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. त्यांचे केवायसी अपडेट बाकी असल्याचे सांगून त्याने त्यांच्याकडून पॅनकार्डची माहिती मागितली. त्यानंतर त्यांना ऍप उघडण्यास प्रवृत्त करुन त्यात त्यांची वैयक्तिक माहितीसह बँक खात्याची माहिती देण्यास सांगितले. ही माहिती दिल्यानंतर काही वेळात त्यांच्या बँक खात्यातून पैसे डेबीट होत असल्याचे मॅसेज त्यांना प्राप्त झाले होते. काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून २८ ऑनलाईन व्यवहार होऊन त्यात सुमारे साडेसहा लाख रुपये डेबीट झाले होते. केवायसी अपडेटच्या नावाने या व्यक्तीने फसवणूक केल्याचे लक्षात येताच त्यांनी घडलेला प्रकार विक्रोळी पोलिसांना सांगितला.