शिंदे गटाच्या आमदारांचे साडेसहा हजार पानांचे प्रतिज्ञापत्र विधानसभा अध्यक्षांना केले सादर

न्यायालयाने दिलेला निकाल आणि निवडणूक आयोगाने दिलेला निकाल याची प्रत सोबत जोडली आहे
शिंदे गटाच्या आमदारांचे साडेसहा हजार पानांचे प्रतिज्ञापत्र विधानसभा अध्यक्षांना केले सादर

मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात दिलेल्या निकालानंतर राज्यातील सत्तासंघर्षातील आमदार अपात्रतेसंदर्भातील सुनावणी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुरू आहे. या सुनावणीतील महत्त्वाचा टप्पा असलेले शिवसेना शिंदे गटाचे प्रतिज्ञापत्र अध्यक्षांसमोर सादर करण्यात आले आहे. शिंदे गटाच्या ३९ आमदारांकडून प्रत्येकी ६५०० पानांचे प्रतिज्ञापत्र देण्यात आले आहे. इतक्या लांबलचक प्रतिज्ञापत्रावर अध्यक्ष काय निर्णय घेतात आणि यासाठी किती कालावधी लागेल, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. आपण सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास करून निर्णय घेणार असून, यात कोणतीही दिरंगाई होणार नसल्याची ग्वाही अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे.

मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांवर सोपविण्यात आला आहे. सुयोग्य कालावधीत ही निर्णय प्रक्रिया पार पाडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ही सुनावणी लवकरात लवकर व्हावी, यासाठी ठाकरे गट पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेला. यावर न्यायालयाने अद्याप सुनावणी केली नसली तरी विधानसभा अध्यक्षांनी मात्र सुनावणीची प्रक्रिया सुरू केली आहे. ठाकरे गटाच्या १४ आमदारांकडून पावसाळी अधिवेशनाच्या काळातच प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली. शिंदे गटाकडून यासाठी वेळ वाढवून मागण्यात आली होती. त्यानुसार शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्षांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. प्रत्येक आमदाराकडून साडेसहा हजार पानांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. आम्ही कसे अपात्र नाही, हे आम्ही स्पष्ट केले आहे, असे शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी नमूद केले आहे.

शिवसेनेत फूट नाहीच

शिवसेनेत कोणतीही फूट पडलेली नाही. मूळ शिवसेना हा पक्ष आमचाच असल्याचे शिंदे गटाच्या आमदारांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. त्याच्या पुष्ट्यर्थ आमदारांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आणि निवडणूक आयोगाने दिलेला निकाल याची प्रत सोबत जोडली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in