
मुंबई : बारा वर्षांच्या मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या एका संशशिताला सहा दिवसांनी त्याच्याच नातेवाईकांकडून पकडून आरसीएफ पोलिसांच्या ताब्यात दिले. मोहम्मद इमाम हुसैन रहिम कुरेशी असे या ३५ वर्षांच्या आरोपीचे नाव असून, त्याची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरू आहै. त्यानेच या मुलाचा अपहरणाचा प्रयत्न केला होता का, या अपहरणामागे त्याचा काय उद्देश होता याचा आता पोलीस तपास करत आहेत.
३६ वर्षांची तक्रारदार महिला चेंबूर, वाशीनाका परिसरात तिच्या कुटुंबीयांसोबत राहते. तिला चार मुले असून, तिचे पती महाबळेश्वर येथे चालक म्हणून काम करतात. १६ ऑक्टोबरला तिने तिच्या बारा वर्षांच्या मुलाला दुकानात मिर्ची मसाला आणण्यास पाठविले होते. पावणेआठ वाजता तो रडत घरी आला. तो प्रचंड घाबरला होता. त्यामुळे तिने त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्याला एका अज्ञात व्यक्तीने त्याच्या तोंडाला हाताने दाबून रिक्षात बसवून कुठेतरी नेण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याने त्याच्या हाताचा चावा घेऊन त्याच्या तावडीतून सुटका केली होती. त्याच्याकडून ही माहिती मिळताच तिला धक्काच बसला होता. त्यानंतर तिने हा प्रकार तिच्या दोन्ही भावांना सांगितला. या माहितीनंतर त्यांनी आरोपी तरुणाचा शोध घेतला; मात्र तो तरुण कुठेच दिसून आला नाही. शनिवारी ती तिच्या मुलासह भावासोबत जेवण करुन वॉकसाठी बाहेर आले होते. यावेळी या मुलानेच एका तरुणाकडे इशारा करुन त्यानेच त्याला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. त्यानंतर तिच्या भावाने या तरुणाला पकडले. चौकशीदरम्यान त्याचे नाव मोहम्मद इमाम असल्याचे उघडकीस आले.