मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! लवकरच सुरु होणार ६ रेल्वे स्थानके

मुंबई लोकलने प्रवास करण्यासाठी महत्त्वाची बातमी म्हणजे लवकरच आणखी ६ रेल्वे स्थानके प्रवाशांसाठी सुरु करण्यात येणार आहेत
मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! लवकरच सुरु होणार ६ रेल्वे स्थानके

मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लवकरच आणखी ६ उपनगरीय रेल्वे स्थानके प्रवाशांसाठी एकाच वेळी उघडली जाणार आहेत. यामध्ये उरण मार्गावरील ५ आणि ठाणे- वाशी मार्गावरील दिघा स्थानकाचा समावेश आहे. या ६ स्थानकांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांसाठी ही खूप आनंदाची बाब आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उरण मार्गावरील गव्हाणपाडा, रांजणपाडा, न्हावा शेवा, द्रोणागिरी आणि उरण ही स्थानके आहेत. यानंतर आता मुंबईतील एकूण लोकल ट्रेन स्थानकांची संख्या १२३पर्यंत जाणार आहे. दरम्यान, उरण मार्गावर चाचण्या सुरु असून लवकरच हा मार्ग वाहतुकीसाठी सुरु करणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे. तसेच, दिघे स्थानक हे नवी मुंबई ट्रान्स हार्बर लाईन आणि मेन लाईन दरम्यान जोडण्यासाठी ठाणे आणि ऐरोली दरम्यान नियोजित करण्यात आला आहे. नुकतेच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिघासह इतर स्थानकांमधील सुविधा आणि नवी मुंबई उपनगरीय नेटवर्कवरील विविध स्थानकांतील स्वच्छता व दुरुस्तीच्या कामांचा आढावा घेतला.

logo
marathi.freepressjournal.in