मुंबई - समुद्रात मासेमारीसाठी निघालेल्या बोटीतून डिझेलचा अवैध साठा ठेवल्याप्रकरणी सहाजणांना येलोगेट पोलिसांनी अटक केली.
महेंद्र कृष्णा कोळी, राजेंद्र सनिचर गंझू, गुरुनाथ हरिश्चंद्र कोळी, इफतेखां इशहाक, छोटू घोशाल तुरी, जियाउल अशरतअली हक अशी या सहाजणांची नावे असून या कारवाईत पोलिसांनी २१ लाख ३७ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर या सर्वांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या बोटीतून मोठ्या प्रमाणात डिझेलचा साठा ठेवण्यात येत असून त्याची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर येलोगेट पोलिसांनी कोस्टगार्डच्या मदतीने समुद्रात गस्त घालून अशा बोटीवर कारवाई सुरु केली होती. ही कारवाई सुरु असतानाच भारतीय कोस्टगार्ड पथकाने एका मासेमारी बोटीवर असलेल्या सहाजणांना ताब्यात घेतले होते. बोटीची झडती घेतल्यानंतर त्यात त्यांना १९५०० लिटर डिझेलचा साठा सापडला. त्याची किंमत १८ लाख २० हजार रुपये आहे. त्यानंतर या बोटीसह बोटीतील डिझेल, सहा मोबाईल आणि इतर साहित्य असा २१ लाख ३७ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. या सहाजणांना नंतर येलोगेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्याविरुद्ध विविध गुन्हे नोंदविण्यात आले. त्यांना पोलिसांनी अटक केली.