
गेले काही महिने राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असताना आता आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. स्कायमेटने अंदाज व्यक्त केला आहे की, यावर्षी देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार आहे. यंदा जून ते सप्टेंबर यामध्ये ९४ टक्के पावसाचा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला. तसेच, राज्यातही कमी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
स्कायमेटच्या प्राथमिक अंदाजानुसार, भारतात जून ते सप्टेंबर या ४ महिन्यांच्या कालावधीत ८५८.६ मिमी सरासरी पाऊस राहण्याची शक्यता आहे. उत्तर आणि मध्य भारतात पावसाची तूट पाहायला मिळणार आहे. तसेच, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला. तर पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तर भारतातील काही भागांमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा प्राथमिक अंदाज असून त्यानंतर पुन्हा एकदा एक अंदाज वर्तवण्यात येणार आहे.