धरण क्षेत्रात पावसाची स्लो बॅटिंग; तुळशीत १३५ मिमी, विहार तलावात १३४ मिमी बरसला

मुंबईत वरुणराजाने उघडीप घेतली असली, तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पावसाची स्लो बॅटिंग सुरू आहे.
धरण क्षेत्रात पावसाची स्लो बॅटिंग; तुळशीत १३५ मिमी, विहार तलावात १३४ मिमी बरसला

मुंबई : मुंबईत वरुणराजाने उघडीप घेतली असली, तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पावसाची स्लो बॅटिंग सुरू आहे. गेल्या चार दिवसांत तुळशी तलावात १३५ मिमी, विहार तलावात १३४ मिमी पाऊस बरसला आहे, तर भातसा तलावात ८८ मिमी, मध्य वैतरणा तलावात ७३ मिमी, मोडक सागर - ६५ मिमी, तानसा - ६४ मिमी आणि अप्पर वैतरणा तलावात सर्वात कमी म्हणजे ४२ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. सातही धरतात पावसाची धुवांधार इनिंग सुरू राहिली, तर मुंबईवरील १० टक्के पाणी कपातीचे संकट लवकरच दूर होईल.

मुंबईची दररोज ३,८५० दशलक्ष लिटर इतकी आणि ठाणे, भिवंडी महापालिकेची दररोज १५० दशलक्ष लिटर इतकी पाण्याची तहान ठाणे, पालघर, नाशिक जिल्हा परिसरातील अप्पर वैतरणा, तानसा, मोडक सागर, मध्य वैतरणा आणि भातसा हे प्रमुख ५ तलाव भागवत असतात. त्यामुळे हे ५ प्रमुख तलाव आणि मुंबई उपनगर परिसरातील तुळशी आणि विहार हे दोन तलाव असे एकूण सात तलाव पावसाळ्याच्या शेवटपर्यंत म्हणजे १ ऑक्टोबरपर्यंत भरलेले (१४,४७,३६३ दशलक्ष लिटर) असणे आवश्यक असते. दरम्यान, सध्या सात तलावात बुधवारी सकाळी ६ पर्यंत फक्त ८०,१४० दशलक्ष लिटर (५.५४ टक्के) इतका म्हणजे पुढील २० दिवस १ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत तलाव क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा मुंबईकरांना आहे.

logo
marathi.freepressjournal.in