
मुंबई : मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक स्वच्छतेसाठी नेमलेले कर्मचारी तसेच बाह्य संस्थांचे कर्मचारी यांनी नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रावर अनुपस्थित राहिल्यास किंवा कर्तव्यात कोणत्याही प्रकारची कसूर केल्यास त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल.
गृहनिर्माण संकुलांमधून संकलित केलेला कचरा खासगी कंत्राटदार रात्रीच्या वेळी रस्त्यांवर टाकून देत असल्याचे निदर्शनास आले आहे. असे प्रकार पुन्हा समोर आले तर ते सहन न करता कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत.
घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात पूर्व उपनगरातील सर्व प्रशासकीय विभागांच्या कामकाजाचा डॉ. जोशी यांनी घाटकोपरस्थित ‘एन’ विभाग कार्यालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.
डॉ. जोशी म्हणाल्या, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी प्रत्येकाला नेमून दिलेल्या परिसराची प्रामाणिकपणे स्वच्छता केली तर संपूर्ण मुंबई महानगर हे स्वच्छ आणि सुंदर राहील. यासाठी सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता आणि मुकादम यांनी आपापसातील समन्वयाने तसेच योग्य संवाद ठेवून जबाबदारी पार पाडावी.
सर्व प्रशासकीय विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रातील स्वच्छता कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावरील उपस्थिती, कामगिरी आदी बाबींची नियमित पाहणी करून आढावा घेणार आहेत. स्थानिक परिस्थिती, वर्दळीची ठिकाणे तसेच मोठ्या प्रमाणात कचरा संकलित होणारी ठिकाणे आदी बाबींचा विचार करून कचरा संकलनासाठी सूक्ष्म आराखडा तयार करण्यात येणार आहे. - डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त पालिका आयुक्त (शहर)