मुंबई : ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी आता प्रत्येक झोपडपट्टीत १२० लिटरचे दोन कचरा पेट्या देण्यात येणार आहे. यासाठी धोरण तयार केले असून आयुक्तांच्या मंजुरीनंतर धोरणाची अंमलबजावणी होणार आहे.
लोकसंख्या दीड कोटींच्या घरात पोहोचली आहे. यापैकी ६० टक्के लोक झोपडपट्टीत राहतात. प्रत्येकाला मूलभूत सुविधा मिळणे हा त्या व्यक्तीचा अधिकार आहे. ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करण्यासाठी ६५ हजार सोसायट्यांमध्ये १ लाख २० हजार कचरा पेटीचे वाटप करण्याचे काम सुरू आहे. तर झोपडपट्टीत कचरा पेटीचे वाटप करण्यात येणार आहे. त्याआधी धोरण निश्चित केले असून आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.
स्वच्छ व सुंदर मुंबई अभियान राबवण्यात येत असून, या अभियानांतर्गत २०३०पर्यंत मुंबई कचरामुक्तीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ओला व सुका कचरा वर्गीकरण करणे गरजेचे आहे. यापूर्वी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कचरा पेटीचे वाटप करण्यात येत होते. परंतु आता सोसायट्यांनी अर्ज केल्यास प्रत्येक सोसायटीला ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी १२० लिटरचे दोन डबे देण्यात येत आहे.
येथे अर्ज करा!
दरम्यान, पालिकेच्या विभागात कार्यालयात अर्ज करणे आणि ७०३००७९७७७ या नंबरवर अर्ज करणे गरजेचे आहे. अर्ज केल्यानंतर १० दिवसांत दोन डबे देण्यात येतील.
दर दोन वर्षांनी नवीन डबे
मुंबईतील सोसायटी, झोपडपट्टीत ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी १२० लिटरचे दोन डबे देण्यात येत आहेत. परंतु डबा खराब झाल्यास नवीन डबा देण्यात येईल, असे ही पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.