मी सक्षम म्हणूनच इतका करेक्‍ट कार्यक्रम; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

थेट नगराध्यक्षांच्या विधेयकावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांविरोधात जोरदार बॅटिंग केली.
मी सक्षम म्हणूनच इतका करेक्‍ट कार्यक्रम; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

“मी सक्षम नसतो, तर इतका करेक्‍ट कार्यक्रम करू शकलो असतो का,” असा सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला. नगरपंचायत आणि नगरपरिषदा निवडणुकीत थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडून देण्यासाठी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले. त्‍यावेळी ते बोलत होते. ग्रामपंचायत हद्दीत जनतेमधून थेट सरपंच निवडून येण्याची तरतूद असणारे विधेयकही सभागृहात मंजूर करण्यात आले. थेट नगराध्यक्षांच्या विधेयकावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांविरोधात जोरदार बॅटिंग केली.

एकनाथ शिंदे यांनीच नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडण्याची तरतूद करणारी कायदा दुरुस्ती २०२०मध्ये महाविकास आघाडी सरकारचे नगरविकासमंत्री म्हणून केली होती. तत्पूर्वीचा सेना-भाजप युती सरकारचा थेट नगराध्यक्ष निवडीचा कायदा तेव्हा बदलण्यात आला होता. यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्‍यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्‍हणाले, “मागची दुरुस्‍ती मी एकट्याने आणली, असे म्‍हणणे योग्‍य नाही. मंत्रिमंडळाचे निर्णय ही सामूहिक जबाबदारी असते. सगळ्यांनी घेतलेला तो निर्णय असतो. तसेच माझ्यावर कोणी दबाव आणू शकत नाही. मी आणि देवेंद्रजी एकत्र होतो म्‍हणून इतका करेक्‍ट कार्यक्रम झाला.” विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नगराध्यक्ष थेट निवडता तर मुख्यमंत्रीपण थेट निवडा, असा टोला लगावला होता. त्‍यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्‍हणाले, “घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच घटनेत तशी तरतूद केली आहे. आता घटना बदला असे अजितदादांना सुचवायचे आहे काय? एखाद्या थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षाने चुकीचे काम केले, तर राज्य सरकार त्यावर कडक कारवाई करेल,” असेही ते म्हणाले. “थेट जनतेमधून नगराध्यक्ष हे काही आज होतेय असे नाही. १९७४ मध्ये तशी दुरुस्ती करण्यात आली होती; पण १९८५ मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारनेच पुन्हा ती तरतूद बदलली. २००६मध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना पन्हा थेट नगराध्यक्ष अशी दुरुस्ती झाली,” असेही ते म्‍हणाले.

मग मुख्यमंत्री पण थेट निवडा - अजित पवार

“नगराध्यक्ष थेट निवडायचा असेल तर मुख्यमंत्री पण थेट निवडा,” असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला. ज्‍यांच्याकडे पैसा, मसल पॉवर असेल ते लोक दादागिरी करून निवडून येतील. लोकशाहीसाठी हे अतिशय घातक असल्‍याचे अजित पवार म्‍हणाले. हे विधेयक मागे घ्‍या किंवा अधिक विचारासाठी दोन्ही सभागृहातील सदस्‍यांचा समावेश असणाऱ्या संयुक्‍त चिकित्‍सा समितीकडे पाठवा, अशी सूचना अजित पवार यांनी केली. छगन भुजबळ यांनीदेखील मुख्यमंत्री शिंदे हे सातत्‍याने भूमिका का बदलत आहेत, हे अनाकलनीय आहे. त्‍यांनी घेतलेले निर्णय तेच आता बदलत असल्‍याचे भुजबळ म्‍हणाले. भास्‍कर जाधव यांनीदेखील हा निर्णय चुकीचा असल्‍याचे सांगितले. यावेळी भास्‍कर जाधव आणि मंत्री शंभूराज देसाई यांची चांगलीच शाब्ि‍दक खडाजंगी उडाली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in