तर भविष्यात राजकारण करायला माणूस नावाचा प्राणी शिल्लक राहणार नाही - अमित ठाकरे

आरेमध्ये कारशेड होऊ नये म्हणून शेकडो तरुण-तरुणींनी संघर्ष केला होता.
तर भविष्यात राजकारण करायला माणूस नावाचा प्राणी शिल्लक राहणार नाही - अमित ठाकरे

एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडल्यानंतर त्यांनी आरे कॉलनीत मेट्रो कारशेड बांधण्याचा निर्णय घेतला आहे. आता मुंबईतील आरे कॉलनीत मेट्रो कारशेड उभारण्यावरून पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. आरेतील प्रस्तावित कारशेड कांजूरमार्ग येथे नेण्याचा निर्णय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. मात्र महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय बदलून मेट्रो कारशेड प्रस्तावित आरेच्या जागेतच होणार, असा निर्णय घेतला आहे. एकीकडे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कौतुक केले असतानाच आरे मेट्रो कारशेडच्या निर्णयावर त्यांचेच सुपूत्र अमित ठाकरे यांनी टीका केली आहे.

अमित ठाकरे यांनी या संदर्भात एक पत्र जारी केले आहे. ‘‘मेट्रो कारशेड आरे जंगलामध्ये करण्याचा नव्या सरकारने घेतलेला निर्णय माझ्यासारख्या असंख्य पर्यावरणप्रेमींसाठी धक्कादायक आहे. आरेमध्ये कारशेड होऊ नये म्हणून शेकडो तरुण-तरुणींनी संघर्ष केला होता. काहींना तर पोलिसांनी गजाआड टाकले होते. आपल्याला विकास हवाच आहे. मात्र, पर्यावरणाचा बळी देऊन नको. आपले पर्यावरण उद्ध्वस्त झाले तर भविष्यात राजकारण करायला माणूस नावाचा प्राणी शिल्लकच राहणार नाही, याचे भान सर्व राजकीय नेत्यांनी बाळगायला हवे. नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आरेतील मेट्रो कारशेडबाबतच्या आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, ही आग्रहाची विनंती,” असे अमित ठाकरे यांनी या पत्रात म्हटले आहे.

प्रस्तावित मेट्रो कारशेडवरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातही जुंपली आहे. त्यातच आता अमित ठाकरे यांनीही या प्रकरणात उडी घेतली आहे. दरम्यान, माझ्या पाठीत ज्याप्रमाणे खंजीर खुपसला तसा मुंबईच्या काळजात कट्यार खुपसू नका, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यांना उत्तर देताना कारशेड आरेतच होणार, असे फडणवीस यांनी सांगितले होते. या वादात आता अमित ठाकरे यांनीही नवीन सरकारला इशारा दिला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in