मुंबई : बदलत्या काळानुसार आता प्रचारासाठी इच्छुक उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्सोयासाठी सोशल मीडियाला पसंती दिली आहे. मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील २९ महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होताच इच्छुक उमेदवारांनी फेसबुक, एक्स, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप, डिजिटल माध्यमांचा वापर सुरु केला आहे.
राज्यातील २९ महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने सोमवार १५ डिसेंबर रोजी केली. निवडणुकीचे बिगुल वाजले आणि राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. जागा वाटप, निवडून येणारे उमेदवार यावर लक्ष केंद्रीत केले आहे. उमेदवारी कोणाला द्यायची हा अधिकार राजकीय पक्षांच्या प्रमुखांचा. मात्र आपणांस उमेदवारी मिळणार असा विश्वास असणाऱ्यांनी सोशल मीडियाचा आधार घेत आपले कार्य मतदारांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक प्रचाराची पारंपरिक पद्धत बदलत असून निवडणुकीत सोशल मीडियाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. पूर्वी प्रचारासाठी सभा, पदयात्रा, भिंतलेखन आणि पत्रके यांवर भर असायचा. मात्र आता स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे प्रचाराचा केंद्रबिंदू सोशल मीडिया ठरत आहे. उमेदवार आपल्या प्रचाराचे व्हिडीओ, रील्स, लाईव्ह प्रसारण, पोस्टर आणि जाहीरनाम्याचे मुद्दे थेट मतदारांपर्यंत पोहोचवत आहेत. काही उमेदवारांनी तर स्वतंत्र सोशल मीडिया टीम तयार केली असून प्रचाराचे नियोजन डिजिटल पद्धतीने केले जात आहे.
तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक व्हिडीओ, महिलांची सुरक्षा, घोषवाक्ये, विकासकामांची माहिती, तसेच विरोधकांवर टीका करणारे पोस्ट शेअर केले जात आहेत. फेसबुक लाईव्हद्वारे सभांचे थेट प्रक्षेपण, इन्स्टाग्राम रील्समधून झटपट संदेश, तर व्हॉट्सॲप ग्रुप्सद्वारे घराघरात प्रचार पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे कमी खर्चात आणि कमी वेळेत मोठ्या प्रमाणावर मतदारांपर्यंत पोहोचणे उमेदवारांना शक्य होत आहे.
निवडणूक आयोगाचे विशेष लक्ष!
सोशल मीडियाच्या वापराबरोबरच काही आव्हानेही समोर आली आहेत. अफवा, खोटी माहिती आणि नकारात्मक प्रचार पसरवला जाण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने सोशल मीडियावरील प्रचारावर विशेष लक्ष ठेवण्याचे संकेत दिले आहेत. आचारसंहिता भंग होणार नाही, यासाठी पोस्ट, जाहिराती आणि प्रायोजित मजकुरावर नियंत्रण ठेवले जात आहे.