मॉलमध्ये केस कापायला आले अन् चारही मारेकरी अडकले; जावयानेच सासऱ्याची सुपारी दिल्याचा झाला खुलासा

कौटुंबिक वादातून राजेंद्र मराठे यांची हत्या त्यांचाच जावई गोविंद सुरेश सोनार याने घडवून आणल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
मॉलमध्ये केस कापायला आले अन् चारही मारेकरी अडकले; जावयानेच सासऱ्याची सुपारी दिल्याचा झाला खुलासा

मुंबई : कौटुंबिक वादातून राजेंद्र मराठे यांची हत्या त्यांचाच जावई गोविंद सुरेश सोनार याने घडवून आणल्याचे तपासात उघडकीस आले आहे. हत्या करण्यासाठी त्याने मारेकऱ्यांना तीन लाखांची सुपारी दिली होती. नंदूरबार येथील रहिवाशी राजेंद्र उत्तमराव मराठे (५३) यांच्या हत्येतील चारही मारेकऱ्यांना गुन्हे शाखेच्या कांदिवली युनिटच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. त्यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असून या चौघांनाही पुढील चौकशीसाठी नंदूरबारच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले आहे.

राजेंद्र मराठे हे नंदूरबार येथील शहादा, सदाशिवनगरचे रहिवाशी असून ते त्यांच्या कुटुंबीयांसोबत राहत होते. १४ मार्चला ते त्यांच्या दुचाकीवरून मार्केटमधून सामान खरेदीसाठी गेले होते. मात्र बराच वेळ होऊन ते घरी परत आले नाहीत. त्यामुळे त्यांची पत्नी मीनाक्षी आणि मुलगा प्रद्युम्न मराठे यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ते कुठेच सापडले नाही. त्यामुळे त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात त्यांच्या मिसिंगची तक्रार केली होती. त्यांचा शोध सुरू असताना १६ मार्चला नांदर्डे ते तळोदा रोडवरील फरशी पुलाजवळ पोलिसांना एका व्यक्तीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. हा मृतदेह त्याचा वडिलांचा असल्याचे प्रद्युम्नने नंतर ओळखले होते.

राजेंद्र यांची हत्या करून अज्ञात व्यक्तीने त्यांचा मृतदेह जाळून हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे शहादा पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांचा तपास नंतर स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. याच गुन्ह्यात नंतर त्यांचा जावई गोविंद सोनारला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच ही हत्या घडवून आणल्याची कबुली दिली. सासऱ्याच्या हत्येसाठी गोविंदने मारेकऱ्यांना तीन लाखांची सुपारी दिली होती. ठरल्याप्रमाणे त्याच्या चारही सहकाऱ्यांनी राजेंद्र यांची गळा आवळून आणि नंतर लोखंडी रॉडने मारहाण करून हत्या केली. त्यानंतर त्याच्या मृतदेहावर केमिकल टाकून जाळण्यात आले होते. त्याचे त्यांनी व्हिडीओ बनवून आरोपी जावई गोविंदला पाठवून ‘गेमओव्हर’ असा मॅसेज पाठविला होता.

हत्येनंतर चारही मारेकरी सुरतला पळून गेले होते. सुरतहून ते गोराई येथे आले होते. ही माहिती स्थानिक पोलिसांकडून मिळताच, पोलीस पथकाने गोराई येथून निलेश बच्चू पाटील, लक्की किशोर बिरारे या दोघांसह १६ आणि १७ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी राजेंद्र मराठे यांची सुपारी घेऊन हत्या केल्याची कबुली दिली. अटकेनंतर या चौघांनाही पुढील चौकशीसाठी स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले.

मॉलमध्ये केस कापताना पकडले

गोराईतील एका मॉलमध्ये ते सर्वजण केस कापण्यासाठी आले होते. तेथून ते पुन्हा पळून जाणार होते. मात्र त्यांचे लोकेशन सापडल्याने त्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. राजेंद्रचा आरोपी गोविंद हा जावई असून त्यांच्यात सतत कौटुंबिक वाद होत होते. या दोघांचे एकमेकांशी अजिबात पटत नव्हते. त्यामुळे त्याने राजेंद्रच्या हत्येसाठी त्याच्याच मित्रांना हत्येची सुपारी दिल्याचे उघडकीस आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in