गणेशोत्सवात चार दिवस ध्वनिक्षेपकाची परवानगी

गेल्या वर्षी गणेशोत्सवात तीनच दिवस मध्यरात्री १२पर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली होती.
गणेशोत्सवात चार दिवस ध्वनिक्षेपकाची परवानगी

मुंबई : मुंबईत यंदा गणेशोत्सवात चार दिवस मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. वर्षभरातील १५ दिवस सकाळी ६ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास परवानगी देण्यात येते. त्यापैकी १३ दिवसांची यादी उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केली आहे.

गेल्या वर्षी गणेशोत्सवात तीनच दिवस मध्यरात्री १२पर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांनी नाराजी व्यक्त केली होती. यंदा मात्र गणेशोत्सवातील चार दिवस मध्यरात्री १२पर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

वर्षभरातील १५ दिवस मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली असून, त्यापैकी १३ दिवसांची यादी उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केली आहे. यामध्ये शिवजयंती, डॉ. आंबेडकर जयंती, महाराष्ट्र दिन, गणेशोत्सवातील चार दिवस, नवरात्रातील दोन दिवस, दिवाळीत लक्ष्मीपूजनाचा दिवस, ख्रिसमसचा आधीचा दिवस २४ डिसेंबर, ३१ डिसेंबर असे हे दिवस आहेत. ईद-ए-मिलादसाठी एक दिवस देण्यात आला आहे, तर आणखी दोन दिवस महत्त्वाच्या कार्यक्रमांकरिता राखीव ठेवण्यात आले आहेत.

उच्च न्यायालयाचा आदेश

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपकाच्या वापरास परवानगी देण्यासाठी दिवस ठरवून देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने १५ पैकी १३ दिवसांची यादी जाहीर केली आहे. ध्वनिप्रदूषण नियम २००० नुसार बंद जागांखेरीज अन्य ठिकाणी सांस्कृतिक किंवा धार्मिक कारणासाठी काही ठरावीक दिवसांकरिता सकाळी ६ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक किंवा ध्वनिवर्धकाचा वापर करता येतो.

गेल्या वर्षी केवळ तीन दिवस परवानगी

गेल्या वर्षी गणेशोत्सवात केवळ तीनच दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वानिक्षेपकाचा वापर करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली होती. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. गणेशोत्सवात दुसरा दिवस, पाचवा दिवस, गौरी विसर्जनाचा दिवस आणि अनंत चतुर्दशी असे चार दिवस ध्वनिक्षेपकाचा मध्यरात्री १२ पर्यंत वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे, तर नवरात्रोत्सवात अष्टमी आणि नवमीच्या दिवशी मध्यरात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार आहे. गेल्या वर्षी पाचव्या दिवशी गौरी-गणपती विसर्जन होते. त्यामुळे एक दिवस कमी करण्यात आला होता. तसेच पुण्यात पाच दिवसांची परवानगी दिली असताना मुंबईवर मात्र अन्याय करण्यात आला. मुंबईबाबत दुजाभाव न करता एक दिवस वाढवून द्यावा, अशी मागणी समितीने केली मागच्या वर्षी केली होती.

logo
marathi.freepressjournal.in