दक्षिण मुंबई झाली गर्दीने हाऊसफुल्ल;फोटो काढण्यासाठी नागरिकांची झुंबड

रस्त्यांवर ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित करून लोकांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग पेटवण्यात आले
दक्षिण मुंबई झाली गर्दीने हाऊसफुल्ल;फोटो काढण्यासाठी नागरिकांची झुंबड

एकीकडे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव थाटामाटात साजरा केल्यानंतर नागरिकांनी मुंबईतील सार्वजनिक स्थळे, हॉटेल आणि रेस्टॉरंट्स तसेच रस्त्यांवर स्वातंत्र्यदिन साजरा केला. मुंबईतील बहुतांश ऐतिहासिक वास्तू तसेच प्रसिद्ध इमारती तिरंगी रोषणाईने नटल्या असून, तेथे फोटो काढण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मंत्रालय, गेटवे ऑफ इंडिया, मरिन ड्राइव्ह, वांद्रे-वरळी सी लिंक, गिरगाव चौपाटी, जुहू बीच तसेच अन्य सार्वजनिक स्थळांसह हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि रस्ते प्रवाशांच्या गर्दीने हाऊसफुल्ल झाले आहेत. रस्त्यांवरून मार्ग काढतानाही मोठी कसरत करावी लागत आहे. सोमवारी सकाळी ‘जय हिंद, भारत माता की जय, वंदे मातरम‌्’ असे देशभक्तीचे नारे देत लोकांनी सायकल तसेच बाइक रॅली काढल्या. अनेक ठिकाणी छोट्या-छोट्या तुकड्यांनीही देशभक्तीपर गीते लावून स्वातंत्र्यदिन साजरा केला. रस्त्यांवर ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित करून लोकांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग पेटवण्यात आले. अनेक जण कार, बाइकवरून झेंडे हवेत फडकवताना दिसत होते. हॉटेल्सबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तसेच गेटवे ऑफ इंडिया, मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, मंत्रालय, सीएसएमटी परिसरात तोबा गर्दी जमली होती. त्यामुळे या परिसरात सुट्टी असूनही वाहतुकीची मोठी कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in