

मुंबई : दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा गेल्या महिन्यात उंदीर मारण्याचे औषध पोटात गेल्याने मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली. न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या अहवालात मृतांच्या व्हिसेरा, जठरातील घटक, पित्त आणि पोटातील चरबीच्या नमुन्यांमध्ये झिंक फॉस्फाईड असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी दिली.
अब्दुल्ला डोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन आणि त्यांच्या मुली आयेशा व झैनेब यांचा या घटनेत मृत्यू झाला होता. तपासणीत कलिंगडाच्या नमुन्यामध्ये झिंक फॉस्फाईड आढळले आहे, तर इतर सर्व खाद्यपदार्थ सुरक्षित असल्याचे निष्पन्न झाले आहे. “या अहवालाचा सखोल अभ्यास केला जाईल. आम्ही फॉरेन्सिक डॉक्टरांचा सल्ला घेणार आहोत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे,” असे उपायुक्तांनी सांगितले.
झिंक फॉस्फाईडचा वापर प्रामुख्याने उंदीर आणि घुशी मारण्यासाठी अत्यंत विषारी कीटकनाशक म्हणून केला जातो. फॉरेन्सिक तज्ज्ञांना चौघांच्याही शरीरात झिंक फॉस्फाईडचे अंश सापडले आहेत. मात्र, हे विष अपघाताने पोटात गेले की नाही, हे अद्याप अस्पष्ट आहे. "संपूर्ण कुटुंबाने इतके टोकाचे पाऊल का उचलले असावे, याचे कोणतेही ठोस कारण आतापर्यंत समोर आलेले नाही," असे दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
या प्रकरणाचा अधिक तपास जे. जे. मार्ग पोलीस ठाण्याकडून केला जात असून, पोलिसांनी नातेवाईक आणि शेजाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. इस्राईल कुर्ते रोडवरील घारी मोहल्ला येथील रहिवासी असलेल्या डोकाडिया कुटुंबाने २५ एप्रिलच्या रात्री नातेवाईकांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. पाहुणे गेल्यानंतर रात्री साधारण १ वाजताच्या सुमारास अब्दुल्ला, त्यांची पत्नी आणि दोन मुलींनी टरबूज खाल्ले.
२६ एप्रिलच्या पहाटे त्यांना उलट्या आणि जुलाबाचा तीव्र त्रास होऊ लागला. त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात आणि त्यानंतर सरकारी जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे उपचारादरम्यान चौघांचाही मृत्यू झाला.